धुळ्यात काँग्रेस, भाजपने डागल्या एकमेकांवर टिकेच्या तोफा! | पुढारी

धुळ्यात काँग्रेस, भाजपने डागल्या एकमेकांवर टिकेच्या तोफा!

धुळे;पुढारी वृत्तसेवा : ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज काँग्रेस व भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे आंदोलन करुन एकमेकांवर टिकेची तोफ डागली. भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे व पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी जेल रोडवर धरणे आंदोलन करत निदर्शने केली.

अधिक वाचा : जळगाव : साडेसहा कोटींचा घोटाळ्याचे धागेदाेरे भुसावळपर्यंत

धुळ्यात आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी व काँग्रेसने एकमेकांवर आरोप करुन आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेल रोडवर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी भाजपवर तोफ डागताना, भाजपच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याची टीका केली. तसेच ओबीसी समाजाचे राजकिय, सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण घालविण्याचे पाप भाजपाच्या देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचा घणाघात काँग्रेसच्या महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी केला. 

अधिक वाचा : नाशिकचे साहित्य संमेलन रद्द होण्याची शक्यता

यावेळी, सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाची आकडेवारी सुप्रिम कोर्टाला दिली नाही. त्यामुळेच आज ओबीसी समाज आरक्षण सवलतींपासून वंचित आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि देशात भाजपाचे सरकार असताना ओबीसी जनगणनचे कोर्टाने आदेश देवूनही त्यांनी त्यावेळी जनगणना केली नाही. मनुवादी भाजपाने आरएसएसचा अजेंडा राबवित ओबीसी आणि देशातील जनतेच्या हक्कावर हल्ला केला आहे. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले होते. मराठा समाजाचे लाखोचे मोर्चे निघाले मात्र सत्तेसाठी समाजात भांडणे लावून फक्त भाजपाच्या दोन ते चारच लोकांकडे सत्ता ठेवण्याचा कुटील डाव भाजपाचा आहे. होवू घातलेल्या जिल्हा परिषदा निवडणूका रद्द करण्याचा ठराव महाविकास आघाडी सरकारने केला असतांना नरेंद्र मोदींच्या अधिपत्याखाली येणार्‍या निवडणूक आयोगाने मात्र हा ठराव नाकारला आहे. त्यामुळे भाजपाचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे. म्हणून  ओबीसी आरक्षणाासाठी रस्त्यावर उतरून एकदिलाने लढा देण्याची आमची तयारी असल्याचे पाटील यांनी शेवटी सांगितले. यावेळी माजी महापौर भगवान करनकाळ, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, माजी आ.प्रा.शरद पाटील, डॉ.दरबारसिंग गिरासे,डॉ.दत्ता परदेशी, गणेश गर्दे आदींनी मनोगत व्यक्त केले.

अधिक वाचा : सैतान झालेल्या सत्यवानाने स्वतःच्या सावित्रीचा केला खून 

दरम्यान ओबीसीच्याच मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ सुभाष भामरे, भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल तसेच पदाधिकाऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन काँग्रेसवर निशाना साधला. राज्यातील सहा महानगरपालिकांमधील ओबीसी कोट्यातून निवडून आलेल्या सदस्यांचे पद न्यायालयाच्या आदेशाने रद झाले आहे. संविधानाच्या मार्गाने ओबीसींना मिळालेले राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्यातील सरकारने या आरक्षणाला टिकवण्यासाठी न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडणे आवश्यक असतांना त्यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी खासदार भामरे यांनी केला.

या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे पोलिसांनी खा. भामरे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेवून त्यांना काही वेळानंतर सोडुन दिले. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, बोबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजयुमोचे हर्षल विभांडीक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान याच मागणीसाठी शिरपुर तालुक्यातील गरताड येथे भाजपाने रास्ता रोको आंदोलन केले. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिपचे अध्यक्ष तुषार रंधे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण आदींनी हे आंदोलन केले.

Back to top button