संग्रहालयाचे काम लवकरच पूर्ण करू | पुढारी

संग्रहालयाचे काम लवकरच पूर्ण करू

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा

समतेचा संदेश जगाला देणार्‍या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे, त्यांची आठवण करणे हे तुमचे-आमचे कर्तव्य आहे. काही कारणाने शाहू जन्मस्थळाच्या संग्रहालयाचे काम लांबले आहे, लवकरच पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मीविलास पॅलेस येथे विकासकामांची माहिती घेताना ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शाहू जन्मस्थळातील वस्तुसंग्रहालयाचा 13 कोटी 40 लाख रुपयांचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. यातील पहिल्या टप्प्यातील 2 कोटी 8 लाखांच्या संग्रहालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पेंटिंग, फोटो कन्झर्व्हेशन, लाकडी काम यासह इतर सुमारे 70 टक्के कामे पूर्ण झाल्याचे यावेळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

सकाळी आठ वाजता शाहू जन्मस्थळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे, खा. संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, ‘गोकुळ’चे चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह इतिहास अभ्यासक, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button