कराड पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी  | पुढारी | पुढारी

कराड पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी  | पुढारी

कराड : प्रतिभा राजे

नगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना गेल्या साडेचार वर्षांत शांत असणार्‍या लोकशाहीने आपली भूमिका जाहीर केली.  यामुळे पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. मात्र, राजेंद्रसिंह यादव गट, भाजप गट यांची काय भूमिका काय असणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनीही पत्रकार परिषद घेतली होती, त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आ. चव्हाण गटाचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकशाही आघाडी व आ. पृथ्वीराज चव्हाण गटही  सक्रिय झाला असला तरी इतर गट आपली भूमिका कधी स्पष्ट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

2016 मध्ये पालिकेच्या निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या जाधव, यादव व उपनगराध्यक्ष पाटील यांच्या गटाने निवडणूक लढवली. लोकशाही व भाजप विरोधात होती. त्यावेळी जनशक्तीला बहुमत मिळाले. मात्र, काही दिवसांतच जनशक्तीने फारकत घेतली ती आजही कायम आहे. साडेचार वर्षांत पालिकेत भाजपाची फाटाफूट, जनशक्तीची तुटातूट आणि लोकशाही, असे एकूण पाच गट दिसून येत आहेत. बर्‍याचदा बहुमतात असणारी जनशक्ती विरोधकांच्या भूमिकेत असते तर लोकशाहीने जनशक्तीबरोबर मिले सूर मेरा तुम्हारा, अशी भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले. नगराध्यक्षांना त्यांच्याच भाजपातील नगरसेवकांनी अनेकदा एकटे पाडले. तर अनेकदा त्या पालिकेच्या सभेत टार्गेट झाल्या. त्यामुळे साडेेचार वर्षांतील पालिकेतील या राजकीय खेळाचे निरीक्षण लोकशाहीने चांगल्या प्रकारे केले असले तरी त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर न देण्यातच शहाणपणा समजला.  काही महिन्यांनी नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे लोकशाहीने योग्य वेळ निवडत आपली भूमिका जाहीर केली. तर ज्या कोणाला निवडणूक लढवायची असेल त्यांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातूनच लढवावी लागेल, असे सांगितले असल्याने लोकशाही बरोबर कोण कोण असणार, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स, आ. चव्हाण यांच्या निधीतून मिळालेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आ. चव्हाण यांची पालिकेतील हजेरी आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे आ. चव्हाण गटाची मोर्चेबांधणी सुरू असून, पालिकेतील काँग्रेस गट सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसची  मोर्चेबांधणी सुरू आहे, असे पदाधिकारी सांगतात. शहर काँग्रेसची पदाधिकार्‍यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली. 

मात्र,  कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमुळे गटामध्ये विस्कळीतपणाही आल्याचे दिसून येत आहे. परिणामी आ. चव्हाण गटाच्या धोरणांमध्ये काही बदल होणार की काय, अशी चर्चा सुरू आहे. 

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्या भाजपातील कितीजण त्यांच्यासोबत आहेत? त्यांची भूमिका काय असणार याबाबत अद्यापही कोणती भूमिका स्पष्ट झालेली नाही तर गटनेते राजेंंद्रसिंह यादव यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ते कोणाशी मिळतेजुळते घेणार की ते स्वबळावर लढले जाणार याबाबतही चर्चा आहेत. सध्या कृष्णा कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ही रणधुमाळी संपली की महिनाभरात उर्वरित गटांच्या भूमिका स्पष्ट होतील, अशी चर्चा आहे. 

उपनगराध्यक्ष कोणाचे?

पालिकेत भाजपा, जनशक्ती आघाडीतील दोन गट, लोकशाही आघाडी असे गट असताना उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील मात्र कधी इकडे तर कधी तिकडे  दिसत आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष नक्की कोणाचे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राजकारणात कधीही, काहीही होवू शकते त्यामुळे लोकशाही आघाडी, राजेंद्रसिंह यादव गट त्यांना सामावून घेणार की अनेकदा नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांना पाठिंबा  दिलेला भाजप त्यांना सामावून घेणार? अशा अनेक उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहेत.  

Back to top button