पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सभेसाठी मुख्यमंत्र्यांकडून अखेर वेळ देण्यात आली आहे. याबाबत येत्या सोमवारी (दि. २३) मुंबई मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्राधिकरणाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प मंजूर होऊ शकतो. पीएमआरडीएच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी पीएमआरडीएच्या पुढील आर्थिक वर्षाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली होती. तथापि, अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळालेली नव्हती. त्याशिवाय, पीएमआरडीएशी संबंधित विविध प्रस्तावांबाबत निर्णय होऊ शकत नव्हता. याबाबत दोनदा मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाने प्रयत्न केले.
तथापि, काही कारणास्तव त्यांची वेळ मिळाली नव्हती. त्यामुळे प्राधिकरण सभादेखील लांबणीवर पडली होती. दरम्यान, आता त्यांनी वेळ दिली असल्याने या सभेत काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात.