पिंपरी : काळाखडक झोपडपट्टी पुनर्वसनासाठी राबविण्यात येत असलेल्या एसआरए प्रकल्पास विरोध करणाऱ्या 'अपना वतन' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काळाखडक झोपडपट्टी रहिवासी संघाने केली आहे. त्यासाठी संघाने गुरुवारी (दि. १२) वाकड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्याकडे दिलेल्या निवेदनानुसार, काळाखडक येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास स्थानिक झोपडीधारकांचा पाठिंबा आहे.
'अपना वतन संघटने'चा प्रकल्पाशी संबंध नसताना, तसेच येथील रहिवासीही नसताना, संघटनेचे सिद्धीक शेख हे प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देऊन स्थानिकांची दिशाभूल करत आहेत. बोगस आणि मृत व्यक्तींच्या सह्यांचे पत्र वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जमा करत आहेत. याबाबत झोपडीधारकांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केले आहेत. त्याची दखल घेत, योग्य तो तपास करून सिद्धीक शेख यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. सह्यांच्या गैरवापरामुळे प्रकल्पामधील कोणताही झोपडीधारक अपात्र ठरून हक्काच्याघरापासून वंचित राहिल्यास त्यास संघटनेला जबाबदार धरावे, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रकल्पातील प्राथमिक पात्रता यादी २ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. याबाबत शेख यांनी चुकीची माहिती देऊन यादी बोगस असल्याची अफवा पसरवून झोपडीधारकांची दिशाभूल केली आहे. शासनाच्या योजनेला बोगस बो- लणाऱ्या शेख यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
माझ्यावरील सर्व आरोप बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत. माझ्या पाठीशी काळाखडकमधील सर्वसामान्य जनता आहे. त्यांना न्याय देण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार. बिल्डरसहित इतर कमिटीला कायदेशीर नोटीस काढली आहे. सत्याचा विजय होईल,
- सिद्धीक शेख, अध्यक्ष, अपना वतन
अपना वतन संघटनेचे सिद्धीक शेख राहत असलेल्या वाकड येथील अण्णा भाऊ साठे नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पात त्यांना घर मिळत असल्याने प्रकल्पाला त्यांनी पाठिंबा दिला. मात्र, काळाखडक येथील प्रकल्पाला स्वार्थासाठी ते विरोध करत आहेत. शेख यांच्या या दुटप्पी भूमिकेविरोधात काळाखडक येथील रहिवाशांनी २ एप्रिल २०२४ रोजी आंदोलनही केले होते. आंदोलनाचा राग मनात धरून त्यांच्याकडून पुनर्वसन प्रकल्पाचे विकसक, काळाखडक रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने नोटिसा दिल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.
माझ्यावरील सर्व आरोप बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत. माझ्या पाठीशी काळाखडकमधील सर्वसामान्य जनता आहे. त्यांना न्याय देण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार. बिल्डरसहित इतर कमिटीला कायदेशीर नोटीस काढली आहे. सत्याचा विजय होईल,
- सिद्धीक शेख, अध्यक्ष, अपना वतन