पिंपरी : गेल्या तीन वर्षात प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत ४६ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यात वायू, जल आणि घातक टाकावू पदार्थांचे प्रदूषण करणाऱ्या जादा ६३० कारखान्यांची भर पडली आहे. शहर परिसरातील वाढत्या प्रदूषणास २९ टक्के कारखाने कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरण अहवालातून समोर आले आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
शहरामध्ये गेल्या तीन वर्षात प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत ४६ टक्याने वाढ झाली आहे. शहरामध्ये २०२०-२१ या वर्षात १ हजार ३६१ इतके कारखाने प्रदूषण करत असल्याचे आढळले होते. २०२३-२४ या वर्षात १ हजार ९९१ कारखाने हे प्रद्दणास कारणीभूत ठरले असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वर्गीकरणानुसार लाल, नारंगी, हिरवा अशा तीन श्रेणीतील असे उद्योग प्रदूषणास कारणीभूत ठरतात. पांढऱ्या श्रेणीतील उद्योग हे प्रदूषणविरहित असतात. दरम्यान, २०२३-२४ या वर्षात पांढर्या श्रेणीसाठी ८६९ उद्योगांची नोंद झाली असून, त्या व्यतिरिक्त ५२४ बांधकाम प्रकल्पांना ही श्रेणी देण्यात आली आहे.
वायुप्रदूषण कंपन्यांतून निघणाऱ्या धुरामुळे
जलप्रदूषण नदीपात्रात रासायनिक सांडपाणी मिसळण्यामुळे
घातक पदार्थाचे प्रदूषण
टाकाऊ पदार्थांच्या निपटाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे
महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये शहरातील एकूण कारखान्यांपैकी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांची टक्केवारी दिली आहे. त्यात २८.८९ टक्के कारखान्यांमुळे वायू, जल आणि घातक टाकावू पदार्थांची निपटाराविरहित निर्मिती अशा तीन स्तरांवर हे प्रदूषण होत असल्याचे म्हटले आहे
रासायनिक उद्योगांमधून प्रामुख्याने प्रदूषण होते. त्यामुळे या उद्योगातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र सांडपाणी नलिकेची व्यवस्था करायला हवी. उद्योगांमध्ये ऑइलवर चालणाऱ्या भट्ट्या गॅसवर केल्या तर प्रदूषणाचे प्रमाण ५० टक्के कमी होऊ शकेल. एमआयडीसी परिसरातील घातक कचरा उचलण्याची सोय पिंपरी चिंचवड महापालिकेने करायला हवी.
अतुल इनामदार, शहराध्यक्ष, भाजपा उद्योग आघाडी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उद्योगातील जलप्रदूषण रोखण्यासाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, मैलाशुद्धीकरण केंद्र उभारायला हवे. त्याचप्रमाणे घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा विलगीकरण केंद्राची सोय करायला हवी. सध्या अनेक नाले थेट नदीत मिसळतात. या नाल्यांतील सांडपाण्यावर प्रथम प्रक्रिया व्हायला हवी.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना