Pimpri News: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील काही रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारी आल्याने पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने संबंधित रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासली जाणार आहे. आयआयटी संस्थेमार्फत ही तपासणी करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएकडून माण-हिंजवडी ते शिवाजीनगर, पाषाण, बाणेर आदी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत पुणे आयटीसीटी मेट्रो रेलला नोटीस बजावली होती. या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीएमआरडीएमार्फत होणार्या
विविध रस्त्यांच्या कामामध्ये पुरेशी दक्षता घेतली जात नसल्याचे आढळत आहे. या पार्श्वभूमीवर, अशा निकृष्ट कामे झालेल्या रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता आयआयटीमार्फत तपासली जाणार आहे. तशा सूचना महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी दिल्या आहेत.
काही रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता आयआयटीमार्फत तपासली जाणार आहे. त्याचप्रमाणे, सेक्टर 12 येथील पहिल्या टप्प्यात बांधलेल्या घरांचे बांधकाम निकृष्ट झाल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांचीदेखील तपासणी केली जात आहे.
- योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए