पिंपरी मतदारसंघ बोपखेलपासून प्राधिकरण, निगडीपर्यंत विस्तारलेल्या पिंपरी या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यात प्रमुख लढत आहे.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनीही मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. येथे तिरंगी आहे. एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात सर्वांधिक 55 लहान व मोठ्या झोपडपट्टया आहेत. त्या मतदारांचा कल महत्त्वाचा ठरणार आहे. मतदारसंघात एकूण 3 लाख 91 हजार 607 मतदार असून, एकूण 398 मतदान केंद्र आहेत.
चिंचवड मतदारसंघ सांगवी ते मामुर्डी-किवळेपर्यंत असलेल्या चिंचवड मतदारसंघात महायुतीतील भाजपाचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गटनेते राहुल कलाटे यांच्यात लढत आहे. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर अपक्ष म्हणून उभे आहेत. एकूण 21 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप, अश्विनी जगताप यांनी प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर यांनी बंडखोरी करीत मतदारसंघात पर्याय निर्माण केला आहे. मतदारसंघात सर्वसामान्य, नोकरदार, सुशिक्षित तसेच, उच्चशिक्षित मतदार आहेत. आयटीचा मतदारही मोठा आहे. एकूण 6 लाख 63 हजार 622 मतदार असून, एकूण 564 मतदान केंद्र आहेत.
भोसरी मतदारसंघात महायुतीतील भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात लढत आहे. सुरुवातीपासून तापलेला प्रचारामुळे तसेच, आरोप-प्रत्यारोपामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
महेश लांडगे यांनी मतदारांसमोर जाताना विकासचा मुद्दा पुढे केला आहे. लांडगे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. तर, अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतल्या.
मतदारसंघात एमआयडीसी, समाविष्ट गावे आणि नव्याने विकसित होत असलेला भागांचा या मतदारसंघात समावेश आहे. शहरी व ग्रामीण असे दोन्ही प्रकाराचे मतदार येथे आहेत. एकूण 6 लाख 8 हजार 425 मतदार असून, 492 मतदान केंद्र आहेत.
मावळ मतदारसंघमावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँगे्रसकडून आमदार सुनील शेळके व अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे हे निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार सुनील शेळके तर बापूसाहेब भेगडे यांना राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व शिवसेना (उबाठा), मनसे यांचा पाठिंबा आहे. मावळ मतदारसंघात 3 लाख 86 हजार 172 मतदार आज मतदान करणार आहेत.