पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गावर खासगी वाहनांनी घुसखोरी करू नये म्हणून सुरक्षारक्षकांना महापालिकेने केबिन दिले होते. पीएमपीएलचे सुरक्षारक्षक गायब झाले आहेत. त्यामुळे हे केबिन धूळ खात पडले असून, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे.
बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी होऊ नये म्हणून पीएमपीएलने निवृत्त सैनिकांना कंत्राटी पद्धतीने वॉर्डन व सुरक्षारक्षक म्हणून नेमले होते. उन्ह व पावसात उभे राहन ते खासगी वाहनांने रोखण्याचे काम करीत होते. फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावून ते स्वतःची उन्ह आणि पावसापासून संरक्षण करीत होते. त्यामुळे महापालिकेने पीएमपीएलच्या वॉर्डन व सुरक्षा रक्षकांसाठी स्वः खचनि केबिन उपलब्ध करून दिले.
निगडी ते दापोडी हा दुहेरी बीआरटी मार्ग आहे. नाशिक फाटा ते वाकड, सांगवी फाटा ते किवळे, काळेवाडी फाटा ते चिखली या बीआरटी मागाँवर केबिन उभारल्या त्यांची संख्या १०० पेक्षा अधिक आहे. कोरोना महामारीनंतर, पीएमपीएमएलने वॉर्डन व सुरक्षारक्षक काढून घेतले. तेंव्हापासून त्या केबिन्सचा वापर बंद आहे. त्याची नियमितपणे स्वच्छता होत नसल्याने त्याची दूरवस्था झाली आहे. काही केबिन्स तुटल्याने कचरा कुंड्या झाल्या आहेत. मद्यपी तसेच, भटक्यांकडून त्याचा वापर होत आहे. रोड स्वीपर मशिनने रस्ते साफ करताना केबिन्स अडथळा असल्याने तेथे कचऱ्याचे ढीग लागले आहेत. वाहनांनी धडक दिल्याने अनेक केबिन तुटल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून बसविलेल्या या केबिनमुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे.
उन्हापावसामुळे पीएमपीएमएलच्या वॉर्डन व सुरक्षारक्षकांची गैरसोय होत असल्याने रोटरी क्लबने महापालिकेस विनामूल्य केबिन उपलब्ध करून दिले होते. सुस्थितीतील हे केविन काढून महापालिकेने लाखो रुपये खर्च करून १०० पेक्षा अधिक केबिन खरेदी केल्या. त्याचा वापर होत नसल्याने तो खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुशोभीकरणावर कोट्यवधीचा खर्च दापोडी ते निगडी या १२.५० किलोमीटर मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेकडून सुमारे २५० कोटींचा खर्च करण्यात येण्यात येत आहे. प्रशस्त पदपथ व सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. तसेच, बसण्यासाठी आकर्षक बाके, आकर्षक पथदिवे उभे करण्यात येणार आहेत. शोभिवंत झाडे लावण्यात येणार आहेत. याच मार्गावरील बीआरटी रस्त्यांवरील तुटलेले व अस्वच्छ केबिन शहराचा नावलौकिकास बाधा पोचवत आहेत.
पीएमपीएमएलने बीआरटी मार्गावरील त्यांचे वॉर्डन व सुरक्षारक्षक काढून घेतले आहेत. त्यामुळे महापालिकेने उभारलेले केबिनचा वापर होत नाही. त्यांची दुरवस्था झाली आहे. बीआरटी मार्गावरील वापरात नसलेले सर्व केबिन काढून घेण्यास संबंधित विभागास कळविले आहे.
बापूसाहेब गायकवाड, (कार्यकारी अभियंता, वाहतूक नियोजन विभागाचे)