

कामगारांसाठी नवीन टाकी बांधल्याने आम्ही सगळे आनंदात होतो. मीदेखील गुरुवारी सकाळी नवीन टाकीतून पाणी आणण्यासाठी बादली घेऊन गेलो. त्या वेळी दहा ते पंधराजण टाकीजवळ अंघोळ करत होते. थट्टा मस्करी करत ते एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. बादली नळाला लावणार, तोच टाकीची भिंत कोसळली. माझ्या हातावर बांधकामाचा काही भाग पडला. मोठमोठ्याने हसण्याचे आवाज क्षणातच किंकाळ्यामध्ये बदलले. धावा... वाचवा... असं म्हणत मी तिथून पळत सुटलो. मदतीसाठी इतर कामगारांना बोलवून आणले. वरवर अडकलेल्या कामगारांची सुटकादेखील केली. मात्र, काहीजण पुरते अडकले होते. आमच्या डोळ्यादेखत तडफडून पाचजणांनी प्राण सोडले... भोसरी येथील घटनेत जखमी झालेल्या तरुणाने ’पुढारी’शी बोलताना थरार सांगितला.
चिरंजित सरकार (23, रा. पश्चिम बंगाल), असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिरंजीत सरकार भोसरीतील सद्गुरुनगर येथे असलेल्या लेबर कॅम्पमध्ये आपल्या सहकार्यांसोबत राहत आहे. मागील काही महिन्यांपासून ते लांडेवाडी, भोसरी येथील एका खासगी कंपनीत काम करीत आहेत. दरम्यान, गुरुवारी दिनांक (दि. 24) सकाळी सहाच्या सुमारास ते झोपेतून उठले. शौचास जाण्यासाठी त्यांनी हातात बादली घेतली. नवीन बांधलेल्या टाकीतून आज पाणी घेऊ, असे मनाशी पुटपुटत ते नवीन टाकीजवळ पोहोचले. त्या वेळी त्यांचे दहा ते पंधरा सहकारी तेथे अंघोळ करत होते. थट्टा, मस्करी करत ते एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत अंघोळी सुरू होत्या. त्या वेळी नियतीच्या मनात मात्र काहीतरी दुसरेच शिजत होते. दिवस-रात्र काबाडकष्ट करणार्या कामगारांचे हसू तिला पहावले नाही. अचानक भिंतींना तडे जाऊन एक मोठा आवाज झाला. तडकलेली भिंत कामगारांच्या अंगावर कोसळली. क्षणातच हसण्याचे आवाज किंकाळ्यांमध्ये बदलले. अंघोळीच्या साबणाने झालेला पांढरा फेस कामगारांच्या रक्तामुळे लाल झाला.
हातावर भिंतीचा एक छोटा तुकडा पडल्याने चिरंजित यांनादेखील असह्य वेदना झाल्या. जिवाच्या आकांताने ओरडत ते मदत मागण्यासाठी पळत सुटले. इतर कामगारांना बोलावून ते पुन्हा टाकीजवळ आले. त्या वेळी ढिगार्याखाली अडकलेल्या कामगारांची जगण्यासाठी धडपड सुरू होती.
ढिगार्यात वरवर अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली; मात्र काही जण पुरते अडकले होते. मदतीसाठी याचना करत होते. मात्र, मदतीसाठी आलेले कामगारही हतबल होते. दरम्यान, काही वेळ सुरू असलेली अडकलेल्या शरीरांची हालचाल शांत झाली. मदतीसाठी ओरडणारे देह निपचित पडल्याने सर्वजण भेदरले. काही वेळाने अग्निशामन विभागासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो, असे सांगत चिरंजित यांनी ‘पुढारी’शी बोलताना घटनेचा थरार सांगितला. तसेच, ढिगार्याखाली अडकले असताना मदतीसाठी याचना करणार्या सहकार्यांचे चेहरे डोळ्यासमोर जात नसल्याचे सांगून शोक व्यक्त केला.