पुणे : प्रतिनिधी
आता गर्भधारणा प्रतिबंधक उपाययोजना करणे ही केवळ महिलांची जबाबदारी राहणार नसून ती पुरुषांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेेक्शन विकसित करण्यात आले आहे. हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध झाल्यास महिलांनी पारंपरिक गर्भधारणा प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया न करता केवळ पुरुषांनी एक इंजेक्शन घेतले तरी कुटुंबनियोजन करता येणे शक्य होणार आहे.
या इंजेक्शनची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून मान्यता मिळण्यासाठी ते 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' कडे पाठवण्यात आले आहे. यातील संशोधकांच्या मते, हे इंजेक्शन घेतल्यास तब्बल 13 वर्षे त्याचा प्रभाव टिकतो. हे इंजेक्शन हार्मोनविरहित असून ते सुरक्षित व परिणामकारक आहे.
या इंजेक्शनची चाचणी दोन मुले असलेल्या आणि जोडीदारासोबत राहत असलेल्या 39 तरूण पुरुषांवर करण्यात आला. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचे आणि जोडीदाराचे सहा महिन्यांनी निरीक्षण करण्यात आले असता त्यांचे आरोग्य चांगले असल्याचे दिसून आले आणि गर्भधारणा राहत नसल्याचे आढळून आले, तर काहींमध्ये अपयशही दिसून आले. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 4 (2015 – 16) अनुसार भारतात 36 टक्के महिला नसबंदी करतात. तर पुरुष नसबंदीचे प्रमाण केवळ 0.3 टक्के इतकेच आहे. तर 53 टक्के जोडपे गर्भनिरोधनाची साधने वापरतात.