बॉलीवूड कलाकारांची करोडोंची मालमत्ता खरेदी | पुढारी

बॉलीवूड कलाकारांची करोडोंची मालमत्ता खरेदी

मुंबई : पुढारी डेस्क

एकीकडे कोरोना महामारी आणि टाळेबंदी यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना बॉलीवूडमधील आर्थिक स्थिती अजून तरी आलबेल असल्याचे दिसत आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांनी नवीन घरखरेदीचा सपाटा लावला असून त्यांच्या किमती ऐकल्या तर डोळे फिरायची वेळ येईल. अजय देवगण याने 60 कोटींचा बंगलाच जुहू येथे खरेदी केला असून त्यापूर्वी बीग बी अमिताभ बच्चन यांनी अंधेरीत 31 कोटींचा ड्युप्लेक्स फ्लॅट घेतला आहे. 

अजय देवगण, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय आलिया भट, जान्हवी कपूर, हृत्विक रोशन यांनीही अलिकडेच अशी आलिशान घरे खरेदी केली आहेत. अजय देवगणने जुहू भागात एका विस्तृत जागेवर अवाढव्य असा बंगला खरेदी केला असून त्याची किंमत तब्बल 60 कोटी रुपये सांगितली जात आहे.

तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांनी 35 कोटींना ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. बच्चन यांच्याकडे मुंबई यापूर्वीच पूर्वापार असणारे जलसा, प्रतीक्षा असे बंगले आहेत. अलिकडेच बच्चन यांनीच लोकप्रिय केलेल्या कौन बनेगा करोडपती या टीव्ही शोच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असून याचकाळात बच्चन यांनी नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. 

कोरोना काळात अनेक हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे. मुळात थिएटरच सुरू नाहीत. अशावेळी कलाकारांना काही काम असावे, तसेच आपलीही कमाई व्हावी, यासाठी काही निर्माते-दिग्दर्शक वेबसिरीजकडे वळले. मात्र, जी कमाई थिएटरमधून होते, ती ऑनलाईन होईलच असे नाही. याशिवाय लॉकडाउनच्या काळात कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील जाहिरातींनाही काहीसा ब्रेक लागला आहे. हे पाहता अभिनेते, अभिनेत्रींच्या उत्पन्‍नावर परिणाम झाला आहे. मात्र, त्यांची कोरोनाग्रस्तांना मदत, या काळात गरजूंना त्यांनी केलेली मदत आणि अशातच त्यांची घरखरेदीची हौस पाहता किमान बॉलिवूडच्या कलाकारांना तरी म्हणावी तेवढी कोरोना टाळेबंदीची झळ बसलेली नाही, किंवा त्यांनी आजवरच्या कारकीर्दीत हा काळ घालवता येईल, एवढी कमाई केली असावी.

असा आहे अजयचा बंगला..

अजय देवगणने जुहूत खरेदी केलेला बंगला 590 चौरस यार्ड क्षेत्रावर विस्तारला आहे. हा बंगला त्याच्या सध्याच्या निवासस्थानाच्या परिसरातच आहे. शक्‍ती असे या बंगल्याचे नाव असून तो कापोळे को. ऑप. हाउसिंग सोसायटीअंतर्गत येतो. अजय देवगणच्या तर्फे माहिती देणार्‍या सूत्रांनी या खरेदी व्यवहाराची माहिती दिली असली तरी  त्याने किंमत सांगितली नव्हती. हा व्यवसाय करणार्‍या रियल इस्टेट व्यावसायिकाने याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे याच भागात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अक्षयकुमार, हृतिक रोशन अशा कलाकारांचीही निवासस्थाने आहेत. वर्षभरापासून या ठिकाणी नवा बंगला घेण्याबाबत अजयचे प्रयत्न सुरू होते. या बंगल्याबाबत नोव्हेंबर, डिसेंबरच्या सुमारास बोलणी सुरु झाली आणि वीना वीरेंद्र देवगण आणि अजय यांच्यानावे हा बंगला 7 मे रोजी हस्तांतरित झाला. हा बंगला यापूर्वी पुष्पा वालिया यांच्याकडे होता. या बंगल्याची मूळ किंमत 65 ते 70 कोटींच्या घरात आहे. मात्र, कोरोना काळ पाहता अजय देवगणला कमी किमतीत 5 ते 10 कोटी रुपयांची सूट मिळेल. यातही उत्सुकतेची बाब म्हणजे बंगला खरेदी केल्यानंतर  अजय देवगण याने तेथे नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. हा खर्च पुन्हा वेगळा असेल.

 

Back to top button