महाविकास आघाडीचे सरकार व्हावे ही नियतीचीच इच्छा : मंत्री मुश्रीफ | पुढारी

महाविकास आघाडीचे सरकार व्हावे ही नियतीचीच इच्छा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा संकट काळ आहे, या काळात उद्धव ठाकरे यांच्यासारखा संयमी मुख्यमंत्री नसता तर काय झाले असते, असा सवाल करत परमेश्वर आणि नियतीचीच आमचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन व्हावे अशी इच्छा होती, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जादा आमदार निवडून येऊनही सरकार स्थापन झाले नाही हे विरोधकांना पटतही नाही आणि पचतही नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुंबईत आज मेट्रो रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याविषयी बोलताना मुश्रीफ म्हणाले, मुंबईच्या विकासाची फार मोठी कामे मार्गी लावण्याचे काम मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. त्यात मेट्रो असेल, न्हावा-शेवा सीलिंगचे काम असेल किंवा कोस्टल रोड असेल. फार गतीने कामे सुरू आहेत.

ठाकरे यांच्या कामाचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. नीती आयोगाने कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले. अनेक सर्व्हेत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केले. चांगले काम असतानाही विरोधक आक्रमक का, असे विचारता विरोधक अस्वस्थ आहे. 

शरद पवार यांच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना भेटण्याची इच्छा मागेच प्रकट केली होती. कदाचित आज त्यांना वेळ दिला असेल. त्यांची विचारपूस करण्यासाठी ते गेेले असतील. ओबीसी आरक्षणाबाबत आलेला निर्णय आपण वाचलेला नाही. त्याबाबतची माहिती घेतली जाईल असे सांगत त्याविषयी अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

Back to top button