एफवाय प्रवेशासाठी होणार आता सीईटी? | पुढारी

एफवाय प्रवेशासाठी होणार आता सीईटी?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बारावीच्या परीक्षा आता रद्द होण्याचे संकेत शिक्षणमंत्र्यांनी दिल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रामणेच बारावीच्या विद्यार्थ्यांची कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच सेल्फ फायनान्स शाखेच्या एफवाय प्रवेशासाठीही सीईटी घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी घेण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रथमवर्ष पदवीसाठीही प्रवेश परीक्षा होण्याची शक्यता आहे. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि राज्यांतील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु व पदाधिकारी यांच्यात प्राथमिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जर बारावीची परीक्षा झाली नाही तर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यावी लागणार असे संकेत दिले आहे. दहावीनंतर जसे प्रवेशात चुरस असते त्याच पद्धतीने एफवाय प्रवेशालाही मुंबई, पुणे यासह राज्यातील प्रमुख शहरात बारावीच्या गुणांना महत्व देत प्रवेशात चुरस असते.  

यामुळे प्रवेशाची असलेली चुरस लक्षात घेत राज्यातील पारंपारिक विद्यापीठांनी प्रवेश परीक्षेचा पर्याय सुचविला असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. कनिष्ठ महाविद्यालय जोडलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीसाठी इन हाऊस कोट्यातून प्रवेश मिळू शकणार आहे. जे विद्यार्थी बाहेरून नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करतात त्यांना ही सीईटी नियोजन करावेच लागणार अशा सूचनाही आल्याचे समजते. सीईटी शाखानिहाय वेगवेगळी होणार आहे. तसेच सध्याच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येईल अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

 

Back to top button