‘वैद्यकीय शिक्षण’च्या परीक्षा १० जूनपासून | पुढारी | पुढारी

‘वैद्यकीय शिक्षण’च्या परीक्षा १० जूनपासून | पुढारी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या येत्या 10 जूनपासून ऑफलाईन पद्धतीने थेट घेण्यात येणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यासाठी नियम व अटींचा आराखडा करीत आहे. त्यानुसार या परिक्षा होतील, असे ते म्हणाले. 

देशमुख सोमवारी सोलापूर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अधिष्ठाता संजीव ठाकूर, आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा कोरोनामुळे लांबल्या आहेत. परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी नियमावली ही तयार करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच या परीक्षा होतील. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचीही खबरदारी घेतली जाईल.

रिक्‍त पदे लवकरच भरणार…

देशमुख म्हणाले, आरोग्य विभागातील विविध रिक्‍त पदे आहेत. जे अधिकार अधिष्ठाता अथवा जिल्हाधिकार्‍यांना आहेत त्यांनी ही पदे तत्काळ     कायमस्वरुपी भरावीत.  तसेच जी पदे शासनस्तरावर परीक्षा घेवून भरणे गरजेचे आहे, ती पदे प्रक्रिया करून लवकरच भरू. काही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नेमण्यात येणार आहेत.त्यासाठीचा प्रस्ताव संबधित विभागाला पाठविण्यात आला आहे. वैद्यकीय महविद्यालयातील विविध प्रकारची रिक्त पदे, पदोन्नतीची पदे, शिक्षक, प्राध्यापकांची पदे ही भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Back to top button