कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदीचा फज्जा | पुढारी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदीचा फज्जा | पुढारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यासह शहरातील संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची बुधवारपासून अंमलबजावणी होईल अशी शक्यता होती. मात्र, जिल्ह्यात अशा चाचण्या झाल्या नाहीत. करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात कडक लॉकडाऊन केले जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र आज त्याचा फज्जा उडाला. टोल नाक्यावरही तपासणी यंत्रणा नव्हती. यामुळे संचारबंदी काळातील गर्दी रोखण्याचे आणि जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांच्या तपासणीचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

जिल्ह्यात 15 जूनपर्यंत संचारबंदीसह कडक निर्बंध कायम आहेत. त्याची प्रभावी अमंलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले होते. जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या सीमा नाक्यावर परजिल्ह्यातून येणार्‍यांच्या ई-पासची तपासणी केली जाईल. प्रवाशांची तपासणी होईल. त्यात लक्षणे असणार्‍यांची अँटिजेन चाचणी करण्याचे आदेशही त्यांनी आरोग्य व पोलिस यंत्रणेला दिले होते. 

कोल्हापूर शहर तसेच नगरपालिका हद्दीत विनाकारण फिरणार्‍यांची जागेवरच तपासणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात सर्वाधिक रुग्ण संख्या व मृत्यू संख्या आहे. या तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार या तीन तालुक्यांतील लॉकडाऊन कडक केले जाईल, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले होते. 

या आदेशांची आज प्रभावी अंमलबजावणी झाली, असे चित्र कुठेच दिसले नाही. कोल्हापूर शहरात पोलिस केवळ वाहनधारकांचे लायसन्स तपासत होते. लायसन्स दाखवून वाहनधारक पुढे मार्गस्थ होत होते. यामुळे वाहनधारक घराबाहेर का पडले, हेच समजत नव्हते. परिणामी त्यांच्या चाचण्या करण्याचा प्रश्नच येत नव्हता, असेच चित्र सर्वत्र होते. त्यातही चाचणी करणारी यंत्रणाही उपलब्ध नसल्याचे चित्र शहरात होते.

दिवसभर संचारबंदी, तरीही रस्त्यावर गर्दी

सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवेसह प्रशासनाने परवानगी दिलेले व्यवसाय, दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुपारी 12 वाजेपर्यंत गर्दी असणे स्वाभाविक आहे. मात्र शहराच्या अनेक मार्गांवर दिवसभर गर्दी दिसत होती. वास्तविक सकाळी 11 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी आहे. आवश्यक कारणांखेरीज घराबाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही रस्त्यावरील गर्दी बुधवारीही कमी नव्हती.

पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोल नाक्यावर आज पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मात्र, प्रवाशांची तपासणी झाली नाही. या ठिकाणी तपासणी करणारी यंत्रणा आज कार्यान्वित करण्यात आली नव्हती. यामुळे आरोग्य तपासणी न करताच प्रवाशांचा जिल्ह्यात सुसाट प्रवेश सुरू होता.

करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण संख्या व मृत्यू संख्या आहे. यामुळे या तालुक्यांत कडक लॉकडाऊन केले जाईल, असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. पण आज या तीनही तालुक्यांत तशी कोणतीच परिस्थिती दिसली नाही. बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मात्र रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याचे चित्र  दिसत नव्हते. संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होण्याची गरज आहे. मात्र तसे कोणतेच चित्र दिसत नसल्याने प्रशासनापुढे गर्दी रोखण्याचे आणि टोल नाक्यावर तपासणीचे आव्हानच आहे.

कोगनोळी टोल नाक्यावरही पोलिस बंदोबस्तात वाढ केली. मात्र, या ठिकाणीही आरोग्य तपासणी सुरू झाली नव्हती. कर्नाटकातून जिल्ह्यात येणार्‍या वाहनांची तसेच दुचाकीस्वारांचीही चौकशी केली जात होती. कोरोना चाचणीचा अहवाल अथवा ई-पास असल्याबाबत तसेच योग्य कारणाबाबत खात्री करूनच वाहनधारकांना प्रवेश दिला जात होता. आता या नाक्यावर चाचण्या कधीपासून सुरू करणार याकडे लक्ष आहे.

बाजारात गर्दी कायम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचे चिन्ह नाही. नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने बाजारपेठांसह रस्त्यावर गर्दी कायम आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत खरेदीसाठी झुंबड असली तरी दिवसभर नागरिकांची  वर्दळ दिसून येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता कोल्हापूर जिल्हा रेड झोनमध्ये गेला. परिणामी लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यात इतर ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली तरी कोल्हापुरातील निर्बंध मात्र कायम आहे. सकाळी सात ते 11 या वेळेत भाजी व किराणा दुकानांना मुभा आहे.  वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मात्र भाजी खरेदीच्या नावाखाली अनेक जण मोकाट  फिरताना दिसत आहे.  बुधवारी सकाळपासून भाजी विक्री परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, रंकाळा परिसर, सिंचन भवन परिसर, मंगळवार पेठ, संभाजीनगर, न्यू महाद्वार, शिवाजी पेठ, ताराबाई पार्क आदींसह विविध भागात भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. भाजी मार्केट बंद असल्याने रस्यावर गल्लोगल्लीत भाजीचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेत्यांची स्टॉल्स आहेत. त्यामुळे अनेक भागात नागरिकांची गर्दी होत असल्याने प्रसंगी वाहतूक कोंडी होत आहे.  

गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. बहुतांश लोकांनी मास्क घातले असले तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना कसा रोखला जाणार, असा सवाल हा प्रश्न अनुत्तरित आहे. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने विनाकारण फिरणार्‍यांची जागेवरच कोरोना टेस्ट घेण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. दुपारनंतर पोलिसांनी कडक तपासणी सुरू केली आहे. चौकाचौकात वाहनधारकांना थांबवून चौकशी केली जात आहे. महापालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासन कडक भूमिका घेत असले तरी नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून कोरोनास हरविण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

Back to top button