कराडात ढगफुटी; रुग्णालयांसह दुकाने, घरांत पाणी | पुढारी

कराडात ढगफुटी; रुग्णालयांसह दुकाने, घरांत पाणी

कराड ः पुढारी वृत्तसेवा

कराड, मलकापूरसह तालुक्याला मंगळवारी दुपारी चारनंतर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या कराड हॉस्पिटल, मलकापूरमधील कृष्णा हॉस्पिटलसह कोल्हापूर नाका, दत्त चौक तसेच विविध भागांतील नागरी वस्त्यांमधून पाण्याचे लोट वाहत होते. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, रुग्णालयातील व दुकानातील, तसेच अनेकांच्या घरांतील संसारपयोगी साहित्य भिजल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली. ढगफुटीने भाजीपाल्याच्या पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाले. 

कराड तालुक्यात मंगळवारी साडेतीन वाजेपर्यंत कडक ऊन होते; मात्र त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. चारच्या सुमारास प्रथम हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. मात्र, 20 ते 25 मिनिटांनी मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. पावसाचा तडाखा एवढा जोरदार होता की अर्धा तासात कराडमधील कोल्हापूर नाका परिसरातील सर्व नाले तुडूंब भरून मुख्य रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते.

साडेचारपासून पावसाचा जोर आणखी वाढून कोल्हापूर नाका परिसरातील रस्त्याकडेला लावलेल्या दुचाकी अर्ध्याहून अधिक पाण्यात गेल्या होत्या. याच परिसरातील कराड हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले होते. तर कृष्णा रूग्णालयातील पोर्चमधून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. कराडमधील कोल्हापूर नाका परिसरातील गजानन प्लॅनेट या दुकानात पाणी शिरून फ्रीज तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्स साहित्य पाण्यात गेले होते. त्याचबरोबर या परिसरातील 100 हून अधिक दुकान व घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. 

याशिवाय कराड शहरातील दत्त चौक, मार्केट यार्ड, कृष्णा नाका यासह शहरातील बेसमेंटला असलेल्या दुकानात पाणी शिरले होते. झोपडपट्टीसह रस्त्यालगतच्या अनेक घरात पाणी शिरून संसारपयोगी साहित्य भिजल्याने लाखो रूपयांची हानी झाली आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाने कहर केला असून पुणे – बंंगळूर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, भिंत पडणे यासारख्या घटना घडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत नेमकी किती हानी झाली ? हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. 

Back to top button