वीकेंड लॉकडाऊन शुक्रवारपासून | पुढारी | पुढारी

वीकेंड लॉकडाऊन शुक्रवारपासून | पुढारी

बेळगाव :  पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आगामी वीकेंड लॉकडाऊन तीन दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सहापासून सोमवारी सकाळी सहापर्यंत वीकेंड लॉकडाऊन असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. गेले तीन आठवडे वीकेंड लॉकडाऊन शनिवार आणि रविवार असे दोन दिवस होता.

शुक्रवार 4 जून रोजी सकाळी 6 पासून सोमवारी 7 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन असेल. या कालावधीत सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतची भाजीपाला खरेदीही बंद असेल.

दूध, खाद्यपदार्थ सेवा, औषध दुकाने, तातडीची वैद्यकीय सेवा, परवानगी मिळालेले नियोजित विवाह आणि आंतरजिल्हा व आंतरराज्य मालवाहतूक या सेवांना लॉकडाऊनच्या कालावधीत परवानगी असणार आहे. रेशन दुकाने आणि कृषी सेवा केंद्रे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत खुली राहतील. त्याचप्रमाणे रयत केंद्रे दुपारी 12 वाजेपर्यंत खुली राहतील. 

पीडीओंच्या परवानगीने शेतकर्‍यांना सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रयत केंद्रामधून बियाणे आणि खतांची खरेदी करता येईल. लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिला आहे.

रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त दुप्पट

बंगळूर : कर्नाटकात पॉझिटिव्हिटी दर 12.30 टक्के असून, दिवसभरात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्या दुप्पट दिसून आली. दिवसभरात 14,304 जणांना बाधा झाली. तर 29,271 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या चोवीस तासांत 464 कोरोना मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत 29,554 जण कोरोना बळी ठरले. 

 

Back to top button