पश्चिम भुदरगड परिसरात हत्तीचा धुमाकूळ | पुढारी

पश्चिम भुदरगड परिसरात हत्तीचा धुमाकूळ

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम भुदरगड परिसरात हत्तीने मोठा धुमाकूळ घालून ऊस पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यातच हत्तीचा वावर नागरी वस्तीकडे वाढल्याने नागरिक भयभित झाले आहेत. तर, वनविभागाच्या कडगाव वनक्षेत्र परिसरातील जंगलात हत्तीचे चार दिवस वास्तव्य असतानादेखील वनविभागाला याचा साधा मागमूसही नव्हता. त्यामुळे कडगाव वनक्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या कामाबद्दल प्रश्?नचिन्ह निर्माण झाले आहे. 

भुदरगडच्या डेळे-भारमलवाडी जंगलात चार दिवसांपूर्वी हत्ती आजरा तालुक्यातून दाखल झाला. हत्तीने या परिसरात उसाचे नुकसान केले. हत्तीने मंगळवारी उकिरभाटले, चापेवाडी या जंगलातून पाळ्याचाहुडा, अनफ खुर्द या गावातून तांबाळे वीजवितरण कार्यलयाच्या दारातून कोंडुशी वनहद्दीत प्रवेश केला होता. त्यानंतर बुधवारी रात्री अंतुर्लीच्या जंगलातून महिला साखर कारखान्याच्या साईटवर दाखल झाला. तेथील तारेचे कुंपण तोडून शिवडावच्या जंगलात गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हत्तीने मोर्चा वळविला. जंगलाशेजारी असलेल्या धनगरवाड्यावरील हेमंत धाकु खरात यांच्या घराच्या दरवाजावर हत्तीने सोंडेने धडक दिली. त्यामुळे हत्तीच्या चाहुलीने खरात कुटुंबीय घाबरून गेले होते. प्रमोद मोरेकर यांच्या शेतातील उसाचे नुकसान करत तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. 

Back to top button