सांगली : कोरोनाबाधित महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती | पुढारी

सांगली : कोरोनाबाधित महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती

मांगले ः पुढारी वृत्तसेवा 

मांगले येथील एका कोरोनाबाधित गर्भवतीला मिरज येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी घेऊन जात होते. मात्र, आष्टा-सांगली या दरम्यान रुग्णवाहिकेतच त्या महिलेची  प्रसूती झाली. 

यावेळी आरोग्यसेविका एस. एस. माने आणि सारिका कांबळे यांनी ही महिला कोरोनाबाधित असूनही स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णवाहिकेतच त्या मातेची सुरक्षित प्रसूती केली. त्यांच्या प्रसंगावधान व तत्परतेमुळे त्या महिलेचा व बाळाचा जीव वाचवला.   

मांगले   येथील 36 वर्षीय गर्भवती  प्रसूतीसाठी  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झाली होती.  दरम्यान, या   महिलेची प्रसूतीपूर्व कोरोना   चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या महिलेस प्रसूतीसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षात दाखल  करण्याचा निर्णय    वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे, डॉ. जयसिंग पवार यांनी घेतला.

त्यानुसार तिला  येथील प्राथमिक आरोग्य  केंद्राच्या रुग्णवाहिकेतून  मिरज येथे नेण्यात येत असताना आष्टा- सांगली दरम्यान त्या महिलेस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. 

त्यावेळी त्या महिले सोबत असणार्‍या एस. एस. माने  व सारिका कांबळे या दोन आरोग्य सेविकांनी प्रसंगावधान राखले.त्या कोरोना बाधित  महिलेची रुग्णवाहिकेच सुखरूप प्रसूती केली.  त्या महिलेस मुलगा झाला. त्यानंतर त्या दोघांनाना सुखरूपपणे मिरज येथील शासकीय रुग्णालयमध्ये  दाखल करण्यात आले.

Back to top button