लॉकडाऊन १४ जूनपर्यंत | पुढारी | पुढारी

लॉकडाऊन १४ जूनपर्यंत | पुढारी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्गावर अद्याप नियंत्रण न मिळाल्याने 14 जूनपर्यंत लॉकडाऊनचा विस्तार करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी गुरुवारी सायंकाळी केली. त्याबरोबरच त्यांनी 500 कोटींचे दुसरे विशेष पॅकेज जाहीर केले. लॉकडाऊन विस्ताराबाबत मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोना संसर्गाचे प्रमाण साडेबारा टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण 5 टक्क्यांवर येईपर्यंत लॉकडाऊनचा विस्तार करण्याची शिफारस तज्ज्ञांनी दिली आहे. संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

एका आठवड्यात संसर्ग प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास सर्वच क्षेत्रांना सवलती दिल्या जातील. 14 जूनपर्यंतच्या लॉकडाऊन काळात याआधीप्रमाणेच सकाळी 6 ते 10 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सवलत दिली जाणार आहे. गेल्या चौदा दिवसांत लोकांनी लॉकडाऊनला सहकार्य केले. त्याचप्रमाणे आगामी काळातही सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केले.

पाचशे कोटींचे विशेष पॅकेज

पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1250 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले होते. पण, त्यामध्ये अनेक घटकांना वगळण्यात आले होते. आता विणकर, आशा कार्यकर्त्यांसह काही घटकांना आर्थिक मदत देण्यासाठी पाचशे कोटींचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

विद्यार्थ्यांना दूध पावडर

लॉकडाऊनमुळे  अतिरिक्‍त दुधाची पावडर तयार केली जात आहे. याचा साठाही वाढत असून शालेय विद्यार्थ्यांना याचे वितरण केले जाईल. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. माध्यान्ह आहारही बंद असून मुलांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. जून आणि जुलै महिन्यात त्यांना प्रत्येकी अर्धा किलो दूध पावडर दिली जाईल. यामुळे सरकारी तिजोरीवर 100 कोटींचा भार पडेल. लघू, मध्यम उद्योगांसाठी मे आणि जून महिन्याचे विजेचे निश्‍चित शुल्क माफ केले आहे. याकरिता 114.70 कोटींची तरतूद केली आहे. इतर उद्योगांसाठी जूनचे निश्‍चित वीज शुल्क भरण्यासाठी 30 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. 

विणकरांना 3 हजार रुपये

प्रत्येक यंत्रमागासाठी दोघांकरिता 3 हजार रुपये मदत घोषित करण्यात आली आहे. सुमारे 59 हजार यंत्रमागधारकांसाठी 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मच्छीमार, पुजार्‍यांना मदत

चित्रपटसृष्टीतील असंघटित कामगार (कलाकार, तंत्रज्ञ) आदींना प्रत्येकी 3 हजार रुपये दिले जातील. याचा लाभ 22 हजार कर्मचार्‍यांना मिळेल. याकरिता 6.6 कोटींची तरतूद केली आहे. 18,746 नोंदणीकृत मच्छीमारांना प्रत्येकी 3 हजार रुपये देण्यात येणार असून याकरिता 5.6 कोटींची तरतूद असेल. 7,668 इनलँड बोटींच्या मालकांना प्रत्येकी 3 हजार रुपये दिले जातील. यासाठी 2.3 कोटी खर्चण्यात येणार आहेत. धर्मादाय खात्याच्या ‘सी’ वर्गातील मंदिरांमध्ये नियुक्‍त 36,047 पुजार्‍यांना प्रत्येकी 3 हजार रुपये मिळतील. यासाठी 10.8 कोटी रुपये दिले जातील.

Back to top button