नियम मोडणार्यांवर कशेडी घाटात कारवाई

खेड : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरुवारी सकाळी 6 वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणार्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई केली. या बसमधून प्रवास करणार्या 29 जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ अँटिजेन चाचणी केली. त्यात एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 9 जून पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी घेऊन जिल्ह्यात येणार्यांनाच 2 रोजी पासून प्रवेश देण्यात येत आहे. मात्र गुरुवारी 3 रोजी सकाळी 6 वाजता कशेडी घाटात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना खासगी आराम बस (एम. एच. 03 सिव्ही 3150) थांबवली असता चालकाकडे व प्रवाशांकडे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आवश्यक परवानगी आढळून आली नाही. पोलिसांनी प्रवाशांना खेड येथे आणून बसमधून प्रवास करणार्या 29 जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे महाड नाका येथील एसटीच्या मैदानात केली. या बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. या प्रवाशाला तातडीने शिवतेज संस्थेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रवासी संगमेश्वर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बसमधून प्रवास करणार्या अन्य 28 जणांची तालुका प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पुढील प्रवासाची व्यवस्था केली आहे. या सर्व प्रवाशांची दिशाभूल करून त्यांना जिल्ह्याच्या हद्दीत घेऊन येणार्या बसचालक व मालक यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया खेड पोलिस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे.