वेरळ घाटीत ट्रक अडकला; महामार्ग ठप्प | पुढारी

वेरळ घाटीत ट्रक अडकला; महामार्ग ठप्प

लांजा : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील वेरळ घाटीत शुक्रवारी सकाळी अवजड ट्रक अडकून पडल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हातखंबा वाहतूक पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेत हा अवजड ट्रक सुमारे दोन तासांनी बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.

महामार्गावरील वेरळ घाटीत शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास एक भलामोठा 64 चाकी अवजड ट्रक अडकून पडला. घाटीतील एका अवघड वळणावर हा ट्रक अडकून पडल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. छोटी वाहने ये-जा करतील एवढीच जागा होती असल्याने मोठी वाहने अडकून पडली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला सुमारे दीड किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

याच दरम्यान ठिकाणाहून एक रुग्णवाहिका जात होती. मात्र, या रुग्णवाहिकेला देखील पुढे जाण्यास जागा नव्हती. त्या नंतर हातखंबा वाहतूक पोलिसांनी याची तातडीने दखल घेत वेरळ घाटीत अडकलेला हा अवजड ट्रक परत रिव्हर्स आणून वेरळ गावात उभा करून ठेवला. त्यानंतर साधारणपणे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल दोन तासांनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात हातखंबा वाहतूक पोलिसांना यश आले. दरम्यान, मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तरी अजूनही वेरळ घाटीत अवजड वाहने अडकून पडून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Back to top button