रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात 10 व 11 जून रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेदशाळेने वर्तवली आहे. यामुळे किनारपट्टीवर पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. 

जिल्ह्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. तरी 10 व 11 जूनला अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. दिवसभरात 200 ते 300 मि.  मी. पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने खाडी किनारी भागात नागरिकांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात संचारबंदी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

ग्रामस्थांना स्थलांतरित करताना यावेळी प्रथमच जनावरांनाही स्थलांतरित करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. तर 30 गावात दरड कोसळण्याची शक्यता आहे. या पूर्वी तेथे दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या असल्याने तेथे अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. तिवरे धरण फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जलसंपदा, जलसंधारण दोन्ही विभागांना आपल्या अखत्यारित असलेल्या धराणांची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून प्रत्येक धरणावर देखभालीसाठी कर्मचारी नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोकादायक वाटणार्‍या धरणाखालील लोकांना स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालये,कोविड सेंटर येथील वीज पुरवठा खंडीत होवू नये यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर दोन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा करण्याचे नियोजन केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

पाऊस पडल्यानंतर पूरस्थितीमुळे साथीचे रोग पसरण्याची  भीती आहे. त्यामुळे साथरोग रोखण्यासाठी आवश्यक उपायोजना करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. पावसाच्या कालावधित नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

10 जूनपूर्वी होणार स्थलांतर

अतिमुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात प्रशासन सज्ज झाले आहे. पुरामुळे नेहमी बाधित होणार्‍या राजापूर, चिपळूण, खेड या तीन तालुक्यांत बोटींसह इतर आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्याचे आदेश नगरपालिकांना देण्यात आले आहेत. खाडी किनारी भागातील अनेक घरांना पुराचा धोका असल्याने तेथील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दि.10 जूनपूर्वी त्यांना स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

 

Back to top button