संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी १५०० कोटी राखीव | पुढारी

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी १५०० कोटी राखीव

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या इशार्‍यानुसार संभाव्य तिसर्‍या लाटेविरुद्ध लढण्यासाठी सरकारकडून तयारी केली जात आहे. त्याकरिता 1500 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्‍वत्थनारायण यांनी सांगितले.

कोरोना जलद कृती दलाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अंदाज वेळीच आला नव्हता. त्यामुळे काही उपाययोजना करण्यास विलंब झाला. त्यामुळे तिसर्‍या लाटेच्या सुरुवातीलाच कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सरकारी रुग्णालय म्हटल्यानंतर सर्वप्रथम दर्जा काय? असा प्रश्‍न निर्माण होतो. तो प्रश्‍न निर्माण होऊ नये, प्राधान्याने रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास जनता आकृष्ट व्हावी, असे डॉ. अश्‍वत्थनारायण म्हणाले. विदेशी जाणार्‍यांना कोरोना लस दिली जाईल. 4 ते 6 आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाईल. याकरिता कोव्हिशिल्डचा वापर होईल. पासपोर्ट क्रमांक दाखवून लस घेता येईल. अनलॉकबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक होईल. त्यानंतर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय जाहीर करतील. 

अनलॉकनंतही कोरोना केअर सेंटर सुरूच राहतील. केंद्र सरकारने लस पुरवण्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकाने 3 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. त्याचे काय करायचे? याचा निर्णय आगामी काळात घेतला जाईल, अशी माहिती डॉ. अश्‍वत्थनारायण यांनी दिली. 

 

Back to top button