कामगारांसाठीच्या दवाखान्याचे शिनोळी येथे लोकार्पण | पुढारी

कामगारांसाठीच्या दवाखान्याचे शिनोळी येथे लोकार्पण

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

शिनोळी खुर्द येथे महाराष्ट्र राज्य कामगार विमा कार्पोरेशन इ. एस. आय. एस. अंगीकृत सुसज्ज  अशा सेवा दवाखान्याचा लोकार्पण समारंभ खासदार प्रा. संजय  मंडलिक यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. 

मंडलिक यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या प्रयत्नामुळे शिनोळीसारख्या औद्योगिक वसाहतीत दवाखाना खास बाब म्हणून मंजूर झाला. याबद्दल शिनोळी ग्रामपंचायतच्या वतीने खासदार मंडलिक, आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार मंडलिक म्हणाले, हा दवाखाना भागातील शाश्वत विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा बळकट होणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या द़ृष्टीने सीमाभागात शिनोळी या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आणण्यात यशस्वी होण्यापाठीमागे कै. नरसिंगराव पाटील यांची पुण्याई असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आमदार राजेश पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेला हा दवाखाना तालुक्यासाठी आधार ठरेल.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुनील शिंत्रे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञानंद मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी सरपंच परशराम पाटील, जि. प. सदस्य अरुण सुतार, पं. स. सदस्य रूपा खांडेकर,  एस. वाय. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भिकू गावडे, बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई आदी उपस्थित होते. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी आभार मानले.

Back to top button