आजरा तालुक्यात ६८ दिवसांत १८९६ बाधित | पुढारी

आजरा तालुक्यात ६८ दिवसांत १८९६ बाधित

आजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये लॉकडाऊनसह विविध उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जाऊनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. 68 दिवसांत 1896 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या, तर 61 जणांचा मृत्यू झाल्याची शासन दरबारी नोंद झाली आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी बाजारपेठेतील गर्दी पाहता तालुकावासीयांना याचे फारसे गांभीर्य नाही, असेच चित्र आहे. दि. 1 एप्रिलपासून दि. 7 जूनपर्यंत एकूण 5 हजार 94 जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी 4504 संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. ठिकठिकाणी 2453 व्यक्तींची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 1 हजार 896 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर संबंधित रुग्णांनी कोव्हिड काळजी केंद्र आजरासह कोल्हापूर व परिसरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. 1896 पैकी कोरोनावर मात करत 1423 रुग्ण घरी परतले आहेत. अद्यापही 412 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. 61 व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

आजही कोरोनाबाधितांची संख्या कायम असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट झालेली नाही. एकीकडे रुग्णसंख्येत घट झाली नसताना दुसरीकडे बाजारपेठ मात्र गर्दीने भरून गेलेली दिसत आहे. अत्यावश्यक सेवा दुपारी चार वाजेपर्यंत सुुरू ठेवण्याचे शासनाने जाहीर केले आहे. 

प्रत्यक्षात मात्र संपूर्ण बाजारपेठ खुली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या शेतकरीवर्ग खरिपाच्या गडबडीत असल्याने जीवनावश्यकसह इतर वस्तू खरेदी करून पावसाळ्याच्या जोडणीत हा वर्ग दिसत आहे. एकंदर आजरा तालुक्यातील चित्र पाहता कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. परंतु, तालुकावासीयांना मात्र याचे फारसे गांभीर्य दिसत नाही.

दंड घ्या; पण दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्या

अत्यावश्यक सेवा सोडून इतर सेवा पुरविणारी बाजारपेठेतील अनेक दुकाने उघडीच दिसतात. नगरपंचायतीकडून अशा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेले अडीच महिने सलग दुकाने बंद असल्याने काही व्यावसायिक वैतागले असून दंड घ्या; परंतु दुकाने उघडण्याची परवानगी द्या, अशी मागणी ते नगरपंचायतीकडे करू लागली आहेत. 

Back to top button