नऊ महिन्यानंतर ६७ मृत्यूंची नोंद  | पुढारी

नऊ महिन्यानंतर ६७ मृत्यूंची नोंद 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 67 जणांची नोंद तब्बल नऊ महिन्यानंतर केल्याची बाब उघड झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नोंदीत सरकारी व्यवस्थापनांमध्येही घोळ झाल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. आता खासगी रुग्णालयांनीही कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नोंदी त्या-त्या वेळी केल्याच नाहीत, ही बाब धक्‍कादायक आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. विरोधकांच्या हाती आता या विषयावरून आयतेच कोलीत मिळाले आहे. आम आदमी पक्षाने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाच्या दररोज दिल्या जाणार्‍या बुलेटिनमध्ये नमूद केलेल्या नोटमधून ही माहिती पुढे आली आहे. 6 जूनपर्यंत राज्यातील एकूण मृतांची संख्या 2 हजार 760 अशी नोंदली गेली होती. सोमवारी (दि.7) रोजी ही आकडेवारी 2 हजार 840 वर पोहोचली. गोमेकॉ आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मागील चोवीस तासांत मृतांची संख्या 13 राहिली. अचानक 67 मृतांची संख्या खासगी रुग्णालयाकडून जाहीर झाल्याने आरोग्य खात्यातह खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे 5 ऑगस्ट 2020 ते 22 मे 2021 अशा नऊ महिन्यांतील मृतांची नोंद खासगी रुग्णालयांनी जाहीर केलीच नव्हती, ती आता जाहीर केली आहे. एवढ्या विलंबाने ही आकडेवारी जाहीर करण्याचे कारण काय, हे मात्र संबंधित आरोग्य खात्यालाच माहीत असणार आहे.

देशभरात कोरोनाच्या मृतांची निश्चित आकडेवारी सांगितलीजात नाही, हे  वास्तव माध्यमांनी मांडले आहे. मध्यंतरी आरोग्य खात्याकडून दोन ते तीन दिवसांपूर्वीचे मृत्यू विलंबाने नोंदविले गेल्याने त्यावेळीही विरोधकांनी राज्य सरकारच्या कामगाजावर प्रश्‍न उपस्थित केले होते. आता खासगी रुग्णालयांच्या या मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.

राज्यात 13 जणांचा मृत्यू

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासांत 13 मृत्यू झाले असून, मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने ती एक दिलासा देणारी बाब आहे. दिवसभरात 2 हजार 745 चाचण्या झाल्या, 418 पॉझिटिव्ह आढळले. 349 जणांना विलगीकरणात उपचारास परवानगी मिळाली. 69 जणांना रुग्णालयात उपचारास दाखल करून घेतले गेले. 1,162 जण चोवीस तासांत बरे झाले, 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या अजूनही राज्यभरात 6 हजार 397 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.22 टक्क्यांवर पोहोचले आहे.

संबंधितांवर कारवाई करणार : राणे

राज्यातील खासगी रुग्णालयांनी कोरोनामुळे मरण पावलेल्यांची माहिती लपवल्याच्या प्रकरणाची आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी कळवले आहे.

Back to top button