जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आज दुपारी १२ पर्यंत बंद | पुढारी

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आज दुपारी १२ पर्यंत बंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

सर्वच व्यवसाय, दुकाने सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि. 9) जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते 12 या वेळेत प्रत्येक दुकानासमोर ‘कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार व्यापारीच कसे?’ असा फलक घेऊन निदर्शने करण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे होते. दरम्यान, दुपारी 12 नंतर दुकाने नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्या आले.

राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली. यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर पाहून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात केला आहे. चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांनी जीवनावश्यक व अत्यावश्यक सर्व दुकाने सुरू करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. पण जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे व्यापार्‍यांनी तीव— आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

या अनुषंगाने मंगळवारी आयोजित बैठकीत  बोलताना चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, जिल्ह्यात  कोरोना तपासणी करणार्‍या खासगी प्रयोगशाळेतील चाचण्यांची नोंद पोर्टलवर होत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा लॅबवर कारवाई सुरू केली आहे. हेच लोक बाजारात फिरून सुपर स्प्रेडर ठरत आहेत. अशांवर कारवाई होत नाही. विनाकारण व्यापार्‍यांना वेठीस धरले जाते. 

गेल्या दोन महिन्यापासून दुकाने बंद आहेत. त्यामुळे महापालिकेचे कोणतेही कर भरायचे नाहीत. घरफाळा सांडपाणी अधिभार, पाणीपट्टीचा स्थिर आकार याबाबतची वाढीव बिले पाठवली आहेत. ती कोणीही भरू नयेत. व्यापार्‍यांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे कोणीही कर भरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.  या आंदोलनात 45  हून अधिक संघटना सहभागी होणार असून जिल्ह्यात सर्वत्र हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेटे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींची अनास्था

लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या व्यापार्‍यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. प्रदीप कापडिया यांनी लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे कोल्हापूर जिल्ह्यावर ही वेळ आली आहे.  व्यापार्‍यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणे, ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले. गेल्या दीड वर्षापासून व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विज्ञान मुंडे यांनी केली. यावेळी आनंद माने,  संदीप वीर, कुलदीप गायकवाड, प्रशांत शिंदे, विक्रम निसार, हरीभाई पटेल आदींनी चेंबर्सच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला. 

दूध सुरू, मेडिकल दोन तास बंद 

या आंदोलनाला केमिस्ट असेासिएशनने आपला पाठिंबा दर्शवला आहे. सकाळी 7 ते 10 सर्व मेडिकल दुकाने सुरू राहणार असून 10 ते 12 हे दोन तास मेडिकल बंद राहतील. 12 नंतर पुन्हा मेडिकल सुरू होतील; तर दूध विक्री सुरूच राहणार आहे. ती कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, असे संजय शेटे यांनी सांगितले.

Back to top button