रत्नागिरी जिल्हा आजपासून अनलॉक | पुढारी | पुढारी

रत्नागिरी जिल्हा आजपासून अनलॉक | पुढारी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री लॉकडाऊनची मुदत संपत असल्याने गुरुवारपासून अनलॉक सुरू होणार का? याबाबत नागरिकांच्या मनात असलेले संभ्रम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दूर केले आहेत. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने व आस्थापना या सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 

शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णवेळ संचारबंदी शिवाय रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. रुग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यामध्ये सहाय्यभूत निर्मिती आणि वितरण युनिटस्सह विक्रेते, वाहतूकदार व पुरवठा साखळी यांचा समावेश आहे. त्याशिवाय लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यास पूरक कच्चा माल निर्मिती उद्योग व सहाय्यभूत सेवा यांचाही समावेश असेल. पशुवैद्यकीय सेवा/ पाळीव प्राणी काळजी केंद्र व त्यांची खाद्य दुकाने, वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरणसंबंधी सर्व कामकाज सुरू राहणार आहे.

किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शितगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा, विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा, स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणार्‍या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणार्‍या सर्व सार्वजनिक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत.

व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स, सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा, सेबी प्राधिकृत बाजार व कार्यालये, स्टॉक एक्सेंज  व त्यासंबंधित अन्य आस्थापना सुरू राहणार आहेत. दुरध्वनी संबंधित सेवा, मालाची व वस्तूंची वाहतूक, पाणी पुरवठा सेवा, कृषी विषयक सेवा सुरळीतपणे चालू ठेवणेसाठी आवश्यक शाखा यामध्ये शेतीच्या साधनांची उपलब्धता, बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती यांचा समावेश यात करण्यात आला आहे. सर्व वस्तूंची आयात – निर्यात, ई कॉमर्समध्ये अत्यावश्यक सेवांचा समावेश करण्यात आला आहे. 

मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियम उत्पादने (जसे की समुद्रातील व किनार्‍यावरील उत्पादने), सर्व कार्गो सेवा, डेटा सेंटर व क्लाऊडसींस व आयटी सेवा ज्या पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवितात, सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम सेवा, टपाल सेवा, बंदरे आणि त्यासंबंधीच्या कृती, लस व जीवनरक्षक औषधे व औषधी उत्पादने यांंच्यासंबंधी वाहतूक करणारे कस्टम हाऊस एजंट परवानाधारक मल्टी मोडल ऑपरेटर्स, कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल व पॅकेजिंग साहित्य बनविणार्‍या आस्थापना, आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरू  राहतील.

कोरोनाचे रुग्ण आणखी वाढल्यास व बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आल्यास बाजारपेठ बंद केली जाईल. त्यामुळे कोव्हीड नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

यासाठी असेल परवानगी…

 किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध-डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने सुरू.

 शासकीय कामकाजाच्या दिवसात सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, सायकलिंग व मॉर्निंग वॉकला पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत मुदत, मैदानी खेळाला परवानगी.

 जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटरला सायं. 4 वाजेपर्यत 50 टक्के उपस्थितीत परवानगी.

 

Back to top button