सांगली : ओढ्यात बुडालेल्या तिघांचा मृत्यू | पुढारी

सांगली : ओढ्यात बुडालेल्या तिघांचा मृत्यू

आटपाडी  ः  पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील घाणंद येथील एकाच कुटुंबातील तीन मुलांचा जांभुळणी- घाणंद दरम्यानच्या ओढ्यात बुडून मृत्यू झाल्याचे सोमवारी दुपारी स्पष्ट झाले. आयुष हेल्पलाईन आणि विश्वसेवा फौंडेशनच्या रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने सोमवारी सकाळी तिघांचे मृतदेह शोधून काढले. 

रविवारी सायंकाळी आनंदा अंकुश व्हनमाने (वय 16), विजय अंकुश व्हनमाने (वय 17) ही दोन सख्खी भावंडे आणि त्यांचा चुलतभाऊ वैभव लहू व्हनमाने (वय 14) या एकाच कुटुंबातील तीन युवक ओढ्यात मासेमारीसाठी म्हणून  गेली होती. लहू व्हनमाने हे सुद्धा त्यांच्या बरोबर होते. परंतु व्हनमाने यांना फोन आल्याने ते मुलांना बंधार्‍यावर सोडून गावात परत गेले होते. 

काही वेळाने लहू व्हनमाने  बंधार्‍यावर परत आले. त्यावेळी  त्यांना तिथे मुले दिसली  नाहीत. ओढ्याच्या कडेला मुलांचे कपडे त्यांना सापडले. थोड्या अंतरावर त्यांना कुत्रे बुडून मरण पावल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना मुले पाण्यात वाहून गेल्याचे लक्षात आले. व्हनमाने यांनी मुलांचा शोध घेतला. परंतु ती  सापडली नाहीत. त्यांनी घटनेची माहिती तहसीलदार सचिन मुळीक व पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन वाहून गेलेल्या  मुलांचा शोध सुरू केला. परंतु ओढा पात्रात झाडे- झुडुपे मोठ्या प्रमाणात असल्याने व अंधार पडल्याने मुलांचा तपास लागला नाही. रेस्क्यू टीमने सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यावेळी उपस्थित होते.

टेंभू योजनेचे बंधार्‍यात सोडलेले पाणी थांबवण्यात आले आणि बंधार्‍यात साठवण केलेले पाणी सोडून देण्यात आले. त्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. चार तासांच्या प्रयत्नानंतर तीनही मृतदेह सापडले. वैभव व्हनमाने आणि एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत आनंदा आणि विजय व्हनमाने असे तिघांचे मृतदेह सापडले. ते त्यांच्या नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी सायंकाळी घाणंद येथे या तीन युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button