सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले | पुढारी

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले

सातारा : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एप्रिल व मे महिन्यात रोज दोन हजारांपेक्षा जास्त बाधित येत होते. परंतु, जून महिना सुरू झाल्यानंतर बाधितांचे आकडे कमी होत आहेत. मंगळवारी दोन महिन्यांनंतर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा 10 टक्क्यांच्या खाली आला. मात्र, बुधवारी पुन्हा हाच रेट थोडा वाढला. दिवसभरात 872 बाधित आढळले असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 2006 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

मे महिन्याच्या अखेरीस इतर जिल्ह्यांमध्ये बाधितांचा आकडा हजारांच्या आत असताना सातार्‍यात मात्र परिस्थिती सुधारलेली नव्हती. परंतु, जून महिना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कमी होऊ लागला. मे महिन्यात असणारा 40 टक्के पॉझिटिव्हिटी रेट हा जूनमध्ये 12 ते 16 टक्क्यांवर आला. मृत्यू दरातही कमालीची घट झाली होती. 

बुधवारी जिल्ह्यात 7 हजार 792 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 872 जण बाधित आढळले.  त्यामुळे आता जिल्हा सप्टेंबर महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आला आहे. मात्र, यंदा टेस्ट जास्त असल्याने पॉझिटिव्हीटी रेट हा 11.19 टक्के आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाधित हजारांच्या आत आल्याने जिल्हवासियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. एकीकडे बाधित कमी येत असताना कोरोनामुक्तांचा आकडा मात्र जास्त असल्याने दिवसेंदिवस उपचाराखालील रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील पंधरवड्यात 20 हजार सक्रीय रूग्ण होते. आता तोच आकडा 11 हजारांवर आला आहे. 

बुधवारी आढळलेल्या 872 बाधितांमध्ये जावली 20, कराड 169, खंडाळा 46, खटाव 130, कोरेगांव 76, माण 82, महाबळेश्वर 6, पाटण 46, फलटण 64, सातारा 195, वाई 24 व इतर 15 असे कोरोना बाधित आढळले आहेत. तर जावली 1, कराड 4, खंडाळा 1, खटाव 3, कोरेगाव 4, माण 3, पाटण 1, फलटण 2, सातारा 9, अशा 28 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 8 लाख 81 हजार 767 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यातील 1 लाख 77 हजार 397 जणांचा अहवाल बाधित आला आहे. तर 1 लाख 61 हजार 986 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत 3 हजार 940जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून 11 हजार 467 जण उपचार घेत आहेत.

म्युकर मायकोसिसचा आणखी एक बळी

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दुसरीकडे मात्र बुरशीजन्य म्युकर मायकोसिसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 95 रुग्ण आढळले असून त्यातील 16 जणांनी यावर मात केली आहे. बुधवारी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे म्युकरच्या मृत्यूंची संख्या 13 वर गेली आहे, तर 66 जणांवर जिल्हा रुग्णालयासह विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Back to top button