सातारा जिल्ह्यात १४५३ जणांची कोरोनावर मात | पुढारी

सातारा जिल्ह्यात १४५३ जणांची कोरोनावर मात

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा कमी होताना दिसत असून कोरोनामुक्तीचा वेग वाढला आहे. मात्र, गुरुवारी 28 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 881 बाधित आढळले असून 1453 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या सव्वा वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. एप्रिलपासून सुरु झालेल्या कोरोनाच्या लाटेने होत्याचे नव्हते झाले. दररोज दोन हजाराच्या घरात बाधित आणि 40 च्या घरात बळी जात होत. दोन महिन्यात एक लाखाहून अधिक बाधित तर 2 हजाराच्या घरात बळी गेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत असून बाधित आकडा 800-900 च्या घरात आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट ही 10-12 टक्क्यांच्या घरात आला असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे पॉझिटिव्ह पेक्षा कोरोनामुक्त आकडा वाढला असल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

गुरुवारी आढळलेल्या 881 बाधितांमध्ये जावली तालुक्यात 25, कराड 179, खंडाळा 108, खटाव 134, कोरेगाव 66, माण 43, महाबळेश्वर 2, पाटण 40, फलटण 62, सातारा 178, वाई 35 व इतर 9 असे कोरोना बाधित आढळले आहेत. तर कराड 11, खटाव 3, कोरेगाव 3, माण 2, पाटण 2, फलटण 1, सातारा 6, अशा 28 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

म्युकरचे आणखी ६ बळी…

कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने आता डोके वर काढले आहे. या बुरशीजन्य आजाराचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत 114 रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळले असून त्यातील 35 जणांनी त्यावर मात केली आहे. तर गुरुवारी आणखी 6 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला असल्याने बळींचा आकडा 19 इतका झाला आहे. दिवसेंदिवस या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नव्वदी पूर्ण; 230 जणांनी हरवले कोरोनाला

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक जिल्ह्यात मृत्यूचा आकडा जास्त आहे. यातही तरुणांचे आणि 60 ते 70 वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण जास्त होते. सातारा जिल्ह्यात 2 हजाराच्या घरात बळी गेले आहेत. त्यात 90 पेक्षा जास्त वय असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य होते. जिल्ह्यातील तब्बल 230 नव्वदी पार लोकांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्याला पहिल्या-दुसर्‍या या दोन्ही लाटांनी अक्षरशा धडका मारल्या. पहिल्या लाटेमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले अनेक लोक बाधित सापडले. विशेषतः नव्वदी पार केलेले लोक विविध आजारांनी आधीच ग्रस्त असतात, अशा लोकांना कोरोना व्याधीने सर्वप्रथम गाठले. जे लोक कामाला बाहेर जात होते, त्यांच्या माध्यमातूनच घरात बसलेल्या वृद्धांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली. वयाची नव्वदी पार केलेले लोक कसे जगणार या प्रश्न संपूर्ण शासकीय यंत्रणेला सतावत होता. जिल्ह्यात 257 इतके वयाची नव्वदी पार केलेले रुग्ण सापडले. त्यापैकी 230 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. अनेक पावसाळे पाहिले हे नव्वदीतील लोक तरुणांसाठी एक आयडॉल ठरले. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली की मरणाची चिंता राहत नाही हेच यातून समोर आले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 90 पेक्षा जास्त वयाचे एकूण 256 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 230 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर अवघ्या 10 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 61 ते 70 या वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेकांचे मृत्यूदेखील झाले. या गटामध्ये जे नागरिक असतात त्यांना हृदयविकार अथवा मधुमेह असे पूर्वीचे आजार असल्याने या वयोगटातील लोक कोरोनावर उपचार सुरु असताना मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त होते.

Back to top button