बेळगावात लॉकडाऊन वाढ शक्य | पुढारी | पुढारी

बेळगावात लॉकडाऊन वाढ शक्य | पुढारी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बेळगाव जिल्हा गोवा, महाराष्ट्राला लागून असल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे, असे मत पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्‍त केले. बेळगाव भेटीच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कारजोळ म्हणाले, महाराष्ट्राशी बेळगाव जिल्हा संलग्‍न असल्यामुळे महाराष्ट्रातून बाधित होऊन येणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बेळगावातील  लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. आम्ही आढावा घेत आहोत. मुख्यमंत्र्यांबरोबर यासंदर्भात उद्या चर्चा होणार आहे.

ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे, तिथेच अनलॉक केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली होती. बेळगावचा दर 10 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे बेळगावात अनलॉक होण्याची शक्यता कमीच आहे. कारजोळ यांनी येथील विश्रामगृहात बुधवारी कोरोना, शेती आणि संभाव्य पूरस्थितीसंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली.

कारजोळ म्हणाले, चिकोडीमध्ये सर्व शासकीय कार्यालये असून, या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणारे आरटीपीसीआर प्रयोगशाळा तत्काळ सुरू होणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये आता ब्लॅक फंगसचे रुग्णही वाढत असून, त्याला तोंड देण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त डॉक्टरांचीही मदत घेण्यात येणार आहे. सध्या शासनाकडे पुरेसे अनुदान असल्यामुळे मशीनरी घेण्यामध्येही कोणती अडचण नाहीत. त्यामुळे चिकोडीमध्ये तत्काळ प्रयोगशाळा सुरू करावी.

यावर्षी पाऊसमान चांगले होणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जलाशये  भरली असल्यामुळे पुराचा धोका आहे. त्याला तोंड देण्यासाठी अधिकार्‍यांनी सज्जता ठेवावी. जिल्ह्यासाठी खते आणि बियांणांचा पुरवठा सुरळीत असल्याचे आणि पुरेसं असल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी शिवगोंडा पाटील यांनी दिली.

यावेळी प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पाटबंधारे उत्तर विभागाचे प्रमुख अरविंद कागणाळी, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शशिकांत मुन्याळ, डॉ. बाळकृष्ण तुक्कार, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह पाटबंधारे, कृषी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चिकोडीत आरटीपीसीआर लॅब लवकरच होणार सरु

जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चिकोडीमध्ये आरटीपीसीआर प्रयोगशाळा तत्काळ सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकार्‍यांना दिल्या. सध्या यासाठी शासनाकडे पुरेसा निधी असल्याचेही कारजोळ यांनी सांगितले. 

तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये मुलांमध्ये बाधा होण्याची अधिक शक्यता असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. त्याला तोंड देण्यासाठी डॉक्टरांना सर्व ती सज्जता ठेवावी, असे आवाहनही कारजोळ यांनी केले. प्रादेशिक आयुक्‍त आम्लन बिस्वास यांनी या संदर्भात नियोजन सुरू असून, यासाठी आम्ही सज्जता केली असल्याचे सांगितले.

 

Back to top button