बेळगावच्या लॉकडाऊनमध्ये आठवड्याने वाढ | पुढारी | पुढारी

बेळगावच्या लॉकडाऊनमध्ये आठवड्याने वाढ | पुढारी

बेळगाव, बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

बेळगावसह 11 जिल्ह्यांतील लॉकडाऊन कालावधी एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे,  तशी घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी गुरुवारी रात्री केली. येत्या सोमवारी म्हणजे 14 जूनच्या पहाटे 6 वाजल्यापासून 21 जूनच्या पहाटे 6 वाजपर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. बेळगावातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे, हे वृत्त दैनिक  ‘पुढारी’ने चार दिवस आधी म्हणजे 7 जूनरोजी प्रसिद्ध केले होते. त्यावर आज शिक्‍कामोर्तब झाले.

आठ जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट (रुग्ण दर – दर 100 चाचण्यांमध्ये किती रुग्ण) अधिक म्हणजे 9 टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी एक आठवड्याने वाढवण्याची शिफारस जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली होती. 

कोरोना संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण मिळू न शकलेल्या बेळगाव जिल्ह्यासह 11 जिल्ह्यांत 21 जूनपर्यंत लॉकडाऊनचा विस्तार करण्यात आला आहे. याआधी 14 जूनपर्यंत लॉकडाऊन जारी केला होता. त्यामध्ये आता आठवड्याची वाढ केली आहे. मंत्री, तज्ज्ञ, अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह दराची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. संसर्ग नियंत्रणात असलेल्या ठिकाणी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र बेळगाव त्याला अपवाद असेल.

बेळगाव जिल्हा प्रशासनाशी आज गुरुवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समधून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. 

बेळगाव जिल्ह्यातील संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी कोरोना मार्गदर्शक सूचीचे कडक पालन केले जावे, अशी सूचनाही येडियुराप्पांनी केली. संसर्ग रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी तपासणी अहवाल शीघ्र उपलब्ध होण्यासाठी उपाय योजले जावेत. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांंपर्यंत कमी होईल यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

रुग्ण दर 9 टक्के

बेळगाव हा गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील जिल्हा असल्यामुळे तसेच येथील पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्याच्या आसपास असल्याने कांही ठराविक गोष्टींना मुभा देऊन येथील लॉकडाऊन आणखी आठवडाभर वाढवावा, अशी शिफारस  उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ऑटोमोबाईल, बांधकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रांना सूट देऊन लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवावा असे त्यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 135 वैद्यकीय पथकाद्वारे 1 हजार 300 खेडेगावांमध्ये रॅपिड न्टीजन टेस्ट करण्यात आली असून, याखेरीज इतर उपाय योजनांद्वारे पॉझिटिव्हिटी रेट 8.9 टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याचे त्यांनी कळवले होते.

चार दिवस आधीच…

बेळगावचा रुग्ण दर 5 जून रोजी 13 टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे हा दर 14 जूनपर्यंत 5 टक्क्यापेक्षा कमी होणार नसल्याने बेळगावचा लॉकडाऊन किमान एक आठवड्याने वाढू शकतो, असे वृत्त दै.‘पुढारी’ने सोमवारी 7 जून रोजी दिले होते. त्यावर गुरुवारी शिक्‍कामोर्तब झाले.

लॉकडाऊन विस्तार झालेले जिल्हे 

बेळगाव, मंगळूर, चिक्कमगळूर, शिमोगा, दावणगिरी, म्हैसूर, चामराजनगर, हसन, बंगळूर ग्रामीण, मंड्या  आणि कोडगू.

Back to top button