येडियुराप्पा यांना वरिष्ठांचे अभय | पुढारी | पुढारी

येडियुराप्पा यांना वरिष्ठांचे अभय | पुढारी

बंगळूर, नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

सध्यातरी पक्षश्रेष्ठींकडे कर्नाटकातील नेतृत्व बदलाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भाजपचे राज्य प्रभारी अरुण सिंग यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्री बदलावरून सुरू असलेल्या गोंधळावर तूर्तास पडदा पडला आहे. 

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पक्षश्रेष्ठींनी सूचना दिल्यास तत्काळ राजीनामा देणार असल्याचे जाहीर विधान केले होते. यामुळे त्यांची गच्छंती होणार का, असा संशय निर्माण झाला होता. शिवाय पक्षातीलच त्यांचा विरोधी गट सक्रिय होऊन श्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली होती. या राजकीय घडामोडींमुळे कर्नाटकातील नेतृत्व बदलाबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. पण, अरुण सिंग यांनी तूर्तास नेतृत्व बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांविरुद्ध स्वपक्षीय जाहीर विधाने करत आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठींनी तंबी दिली आहे. जाहीर विधान केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत अरुण सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकात कोणतेही  बदल करण्याचा निर्णय झालेला नाही. तशी कोणतीही शिफारस किंवा प्रस्ताव श्रेष्ठ समोर आलेला नाही. मुख्यमंत्रीच काय प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनाही बदलणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. नेतृत्वबदलाची चर्चा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. तशी कोणतीच चर्चा पक्ष पातळीवर झालेली नाही. कोरोनावर नियंत्रणाची गरज असताना महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जाणार नाहीत. मुख्यमंत्री येडीयुरप्पा योग्यरीत्या प्रशासन हाताळत आहेत. कोरोना स्थितीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला जात आहे.

17 किंवा 18 जूनपासून तीन राज्यांचा दौरा करणार आहे. सर्व नेत्यांची मते जाणून घेतली जातील. कोणत्याही समस्या असतील तर त्या पक्षपातळीवर सोडवल्या जातील, असे अरुण सिंग यांनी सांगितले.

 

Back to top button