कोरोनातच जनतेला वीज दरवाढीचा झटका | पुढारी

कोरोनातच जनतेला वीज दरवाढीचा झटका

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

आधीच कोरोना महामारीमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला आता वीज दरवाढीचा झटका बसला आहे. युनिटमागे 30 पैसे दरवाढ करण्यात आली असून सामान्य जनतेला शॉक बसला आहे. एप्रिल महिन्यापासून ही दरवाढ आकारली जाणार आहे.

वीज वितरण कंपन्यांकडून विजेच्या दरात 30 पैसे वाढ झाली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने हा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसीटी) या चालू आर्थिक वर्षासाठी सर्व वीजपुरवठा कंपन्यांच्या ग्राहकांना लागू असलेल्या दरात सरासरी 30 पैसे वाढीस मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यातील जनतेला मोठा शॉक दिला आहे. कर्नाटक वीज नियामक मंडळाने विजेच्या दरात प्रतियुनिट 30 पैशांची वाढ केली असून, सुधारित दर लागू झाले आहेत. गेल्या मार्चपासून दरवाढ करण्याचा वीज वितरण कंपन्यांचा प्रस्ताव होता. तथापि, कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पोटनिवडणुकीमुळे सरकारने दरवाढीस मान्यता दिली नव्हती. आता पोटनिवडणूक संपताच सरकारने वीज दर वाढीस हिरवा कंदील दिला आहे. केएसईबीने कर्नाटक वीज नियामक आयोगामार्फत प्रतियुनिट 30 पैसे दरवाढीचा आदेश दिला आहे.

आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आयोगाने प्रतियुनिट दरात सरासरी 30 पैशांची वाढ मंजूर केली आहे. परिणामी, सरासरी वित्तीय वर्ष 2021-22 साठी 3.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 एप्रिलनंतर किंवा त्यानंतर येणार्‍या पहिल्या मीटर रीडिंगच्या तारखेपासून वापरल्या जाणार्‍या वीज शुल्काची अंमलबजावणी होईल.

Back to top button