सातार्‍यासाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट ! | पुढारी | पुढारी

सातार्‍यासाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट ! | पुढारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे रविवारपासून (दि. 13 ते 15 जून) मंगळवारपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात ‘ रेड अ‍ॅलर्ट’ तर पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

राज्यात यावर्षी नियोजित वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सूनने राज्यभर हजेरी लावली. राज्यात दरवर्षी 15 जूनच्या आसपास मान्सून व्यापतो. मात्र यावेळी 10 जूनपूर्वीच त्याने महाराष्ट्र व्यापला आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 24 तासांत या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. हा पट्टा उत्तर पूर्व बंगालच्या उपसागरापासून ओडिशा, पश्चिम बंगाल तसेच ओडिशा पार करून पुढे सरकणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. मध्य पूर्व अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तसेच मध्य पूर्व अरबी समुद्रापासून कोकणपर्यंत द्रोणीय स्थिती कार्यरत आहे. या तीनही स्थितीमुळे राज्यात कोकण किनारपट्टीसह घाटमाथा आणि विदर्भात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

याबरोबरच परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागातही 15 जूनपर्यंत ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तेथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. परिणामी राज्यात पुढील तीन दिवस सूर्यदर्शन होण्याची शक्यता खूप कमी आहे.

दरम्यान, शनिवारी मान्सून उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरातचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर बंगालचा उपसागर या भागात स्थिरावला आहे. मात्र मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती असल्यामुळे येत्या 48 तासांत गुजरातचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश, पूर्ण ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि उत्तर बंगालचा उपसागर व्यापणार आहे.

Back to top button