कोल्हापूर आता अनलॉक कराच | पुढारी | पुढारी

कोल्हापूर आता अनलॉक कराच | पुढारी

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

पुण्यात ज्याप्रमाणे सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे तोच नियम कोल्हापूरला लागू करा व सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. कोरोना रुग्णवाढीची कारणे शोधून कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत; पण आम्हाला अनलॉक करा, अशी साद प्रशासनाला घातली आहे.

बांधकाम क्षेत्र सुरू आहे. काहींची बांधकामे पूर्ण झाली आहेत; पण प्लायवूड व टिंबर मार्केट बंद असल्याने त्याचा फटका बांधकाम व्यवसायाला बसत आहे. त्यामुळे प्लायवूड व टिंबर मार्केट तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली.

लग्नसराई तसेच सणासुदीच्या काळात सराफ व्यवसाय बंद झाला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शासनाने सकाळी 7 ते दुपारी 2 अथवा सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलीच पाहिजे. व्यवसाय बंद असल्याने जीएसटी, लाईट, पाणी बिले माफ करावीत, अशी मागणी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केली आहे.

लॉकडाऊन असला तरी घरगुती जीवनाशी निगडित फॅन, मिक्सर, मोटार रिवायंडिंग, लाईटच्या कामाला इलेक्ट्रिक साहित्य लागते. त्यामुळे नियम घालून द्या, त्यांचे पालन करू; पण दि. 15 जूननंतर सगळी दुकाने अनलॉक करा, अशी मागणी इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी यांनी केली.

लॉकडाऊनचा फटका कापड व्यवसायाला बसला आहेे. गेल्या दीड वर्षापासून हा व्यवसाय बंद आहे. आता जिल्हा अनलॉक करा, अशी मागणी कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील यांनी केली.

कोरोनामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायावर संक्रांत  आली आहे. पर्यटन तसेच लग्नसराईचा काळ संपला आहे. पावसाळ्यात पर्यटकांची थोडीशी साथ मिळते; पण त्यासाठी जिल्हा अनलॉक करा, अशी मागणी हॉटेलमालक संघाचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी केली.

इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. व्यवसाय बंद असल्याने कामगार पगार व अन्य देणी भागवणे शक्य नाही. शासनाने किमान काही वेळेसाठी हा व्यवसाय सुरू करण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी दीपक केशवानी यांनी केली.

शासनाने जे नियम घातले, त्यांचे आम्ही पालन करत आलो आहे. तरीही कोरोना आटोक्यात येत नसेल, तर प्रशासनाने आता नेमक्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. आम्ही शासनाला सहकार्य केले आहे. व्यापार चालला तरच शासनाला कर मिळणार आहे. सद्यस्थितीत दुकाने बंद करणे परवडणारे नाही, त्यामुळे दि. 15 जूननंतर सर्व दुकाने सुरू करा.
 – संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स 

Back to top button