पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवरून राजकीय टोलेबाजी | पुढारी

पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवरून राजकीय टोलेबाजी

मुंबई : वृत्तसंस्था

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शित केल्यानंतर त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जोरदार टोलेबाजी सुरू झाली आहे. गुरुवारी अकोला येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्‍त केली होती. पटोले यांनीही यावेळी मुख्यमंत्रिपदाची इच्छा जाहीर केली. पटोले यांनी त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने करण्याचा सल्लाही दिला. मात्र, पटोले यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा आणि स्वबळाच्या घोषणेवरून जोरदार राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

पटोले यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले आहे. पटोले यांनी स्वबळाची घोषणा केली असली तरी महाविकास आघाडीतील पक्ष किमान समान कार्यक्रमाच्या सूत्रावर एकत्र आले आहेत. पटोले यांनी त्यांचा पक्ष एक नंबर करावा, मात्र त्यांनी राज्यातील सत्तेत आपण भागीदार आहोत, हे विसरू नये, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेचे वक्‍तव्य त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्‍वास नसल्याचे दर्शवते, अशी टीका भाजपचे राम कदम यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपमानित करत आहेत ते दुःखही पटोले यांच्या विधानातून स्पष्ट होते, असे कदम यांनी म्हटले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पटोले यांनी जाहीर केलेल्या इच्छेविषयी विचारले असता त्यांनी  पटोले यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत, एवढेच उत्तर दिले आहे.

सामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवणार : पटोले

भाजप हा कायम आमचा विरोधी पक्ष आहे. भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणार्‍यांची आपल्याकडे मोठी यादी आहे. पण आता सामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवले जाईल, असे पटोले यांनी म्हटले आहे.

 

Back to top button