पालिकेला ‘हवामान’ इशारा कळलाच नाही? | पुढारी

पालिकेला ‘हवामान’ इशारा कळलाच नाही?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेने रविवारी मुंबई शहर व उपनगरांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. मात्र त्यानंतर मुंबईत सकाळी 8 ते सायंकाळी 8 या 12 तासांत फक्त 8 मिमी पावसाची नोंद झाली. त्यावर भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान विभागाचा इशारा कैक तज्ज्ञांना कळलाच नसल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे मुंबई मनपालाही हवामान विभागाचा इशारा कळला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई महापालिकेने दुपारी 12 वाजता मुंबई शहरात व उपनगरांत पुढल 24 तासांत जोरदार पावसाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर पुढील 12 तासांत मुंबई शहरात 2.54 मिमी, पूर्व उपनगरात 1.86 मिमी आणि पश्चिम उपनगरात 2.59 मिमी पावसाची नोंद झाली. ढगाळ वातावरणात उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी दुपारपासूनच हवामान विभागाचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली. त्यावर ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी रात्री चुप्पी सोडत काहींना सडेतोड उत्तरही दिले.

ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, काही तज्ज्ञांना हवामान विभागाकडून वर्तवण्यात येणार्‍या अंदाजाचा अर्थच कळत नाही. लोकांनी घराबाहेर पडू नये, असे कुठेही हवामान विभागाने म्हटलेले नाही. विजेचा कडकडाट होणार असल्याने लोकांनी बाहेर पडताना खबरदारी घेण्यासाठी हा अंदाज वर्तवला जातो. इतकेच नाही, तर मोठ्या झाडांखाली उभे राहू नये असेही त्याचा अर्थ असतो. त्यावर काही नेटकर्‍यांनी मुंबई महानगरपालिका आणि हवामान विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत असल्याचे म्हटले आहे. तसेच हवामान विभागाने संबंधित यंत्रणांना त्यांच्या अंदाजाबाबत सोप्या भाषेत सांगितले, तर नक्कीच मुंबईकरांनाही त्याचा फायदा होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

 

Back to top button