सातारा जिल्ह्यात आज, उद्या कडक लॉकडाऊन | पुढारी

सातारा जिल्ह्यात आज, उद्या कडक लॉकडाऊन

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी दूध, मेडिकल दुकाने, रुग्णालये, कृषी दुकाने वगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे किराणा, भाजीपाला विक्री करता येणार नाही. पूर्वीच्या आदेशानुसार वीकेंड लॉकडाऊन यापुढे राहणार आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कायम असल्याने जिल्हा अनलॉक संदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश ‘जैसे’ थे ठेवले आहेत.  

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना  केल्या जात आहेत. आता कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार असून त्यानंतर ‘लॉक-अनलॉकड’ संदर्भात जिल्हा आपत्ती प्राधिकरण समितीची बैठक होवून निर्णय घेतला जाणार आहे.  आठवडाभराचा डाटा सादर झाल्यानंतर शुक्रवारी  समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 10 च्यावर असल्यामुळे सातारा जिल्हा अद्यापही चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यापूर्वीचे आदेश कायम केले आहेत. त्यानुसार सध्या सुरु असलेल्या अत्यावश्यक सेवा विहित वेळेत सुरु राहणार आहेत. मात्र विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे शनिवार आणि रविवारी दूध, मेडिकल दुकाने, दवाखाने, पेट्रोलपंप व यासंबंधी आस्थापना विहित वेळेपर्यंतच सुरु राहणार आहेत. मात्र, किराणा, भाजीपाला, मटण, चिकन, बेकरी आदि अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या सेवा बंद राहणार आहेत.

सध्या खरीप हंगाम सुरु झाला असून शेतीच्या कामांची लगबग सुरु आहे. शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे, किटकनाशके आदि साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी कृषी सेवा केंद्रे, दुरुस्ती व देखभाल पुरवणारी दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच दुपारी 4 वाजेपर्यंत शेतीच्या मशागतीची कामे करता येणार आहेत. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनमधून शेती विषयक कामकाजाला वगळल्याने  विकेंड लॉकडाऊनमध्येही विहित वेळेत  शनिवार आणि रविवारीही शेतीचे कामकाज सुरु ठेवण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन राहणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत असलेली वृत्तपत्र कार्यालये व वितरण व्यवस्था नियमितपणे सुरु राहणार आहे.

सोमवारपासून शैक्षणिक साहित्याची घरपोच सेवा 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी दि. 14 रोजीपासून सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत शैक्षणिक साहित्याची घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड व्यापल्याच्या टक्केवारी निकषानुसार जिल्हा अद्यापही चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

Back to top button