गोवा राज्यात 24 तासांत 13 रुग्ण दगावले | पुढारी

गोवा राज्यात 24 तासांत 13 रुग्ण दगावले

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील खासगी रुग्णालयांकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती लपविण्याचे प्रकार अजूनही उघड होत आहेत. गुरुवारी दक्षिण गोव्यातील कुडतरीच्या खासगी रुग्णालयाने 4 जून रोजी झालेल्या मृत्यूची माहिती 10 रोजी जाहीर केली. त्याशिवाय मागील 24 तासांत 13 जण दगावले असून, राज्यातील एकूण मृतांची संख्या 2 हजार 891 वर गेली आहे.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 3 हजार 298 जणांची दिवसभरात चाचणी झाली. 413 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 364 जणांना विलगीकरणात राहून उपचार घेता येणार आहेत. 67 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले गेले. मागील चोवीस तासांत 585 बरे झाले, तर 86 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के एवढे नोंदले गेले. राज्यभरातील सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 605 एवढी नोंदली आहे. राज्यातील सर्वाधिक 385 सक्रीय रुग्ण मडगावच्या आरोग्य केंद्राच्या हद्दीत आहेत, तर सर्वात कमी 39 सक्रीय रुग्ण कासारवर्णे आरोग्य केंद्राच्या हद्दीत आहेत.

मागील चोवीस तासांत मृत झालेल्या 13 मधील 7 गोमेकॉत, दोन दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात, 2 दक्षिणेतील खासगी रुग्णालयात आणि 2 उत्तर गोव्यातील खासगी रुग्णालयात दगावले आहेत.

 

Back to top button