बांदा-पानवळ परिसरात आढळले डेंग्यूचे रुग्ण | पुढारी

बांदा-पानवळ परिसरात आढळले डेंग्यूचे रुग्ण

बांदा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संकट  कायम असताना बांदा-पानवळ येथे  डेंग्यूचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य कर्मचार्‍यांनी रविवारी पानवळ येथे तत्काळ सर्वेक्षण सुरू केले आहे. लोकांनी घाबरून न जाता आपल्या घराजवळ पाणी साठू न देता स्वच्छता ठेवावी, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.

बांदा शहर व परिसरात सध्या कोरोना रुग्णाची संख्या चिंताजनक आहे. त्यात पानवळ येथे डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने संकट आणखी गंभीर बनले आहे.  पानवळ येथील एक महिला व एक पुरुष अशा दोघांना ताप येत असल्याने हे दोन्ही रुग्ण बांदा येथील खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. त्यांच्यात डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरने त्यांनी रक्‍त तपासणी केली असता हे दोन्ही रुग्ण डेंग्यू बाधित असल्याचे निष्पन्‍न झाले. या पार्श्‍वभूमीवर सरपंच अक्रम खान यांनी आरोग्य अधिकार्‍यांसोबत चर्चा करून रुग्ण आढळलेल्या परिसराचे ताताकाळ सर्वेक्षण करण्यास सांगितले होते.

आरोग्य परिचारिका कीर्ती भाईप, आरोग्य सेवक दत्ताराम म्हापणकर यांनी रविवारी सकाळी पानवळ परिसरात सर्वेक्षण केले. परिसरातील कुटुंबियांचे रक्‍त नमुने तपासणीसाठी घेत असून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर उपस्थित होते. दरम्यान यातील महिला रुग्ण गोवा येथील खाजगी रुग्णालयात तर पुरुष रुग्ण सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत  असल्याचे आरोग्य कर्मचार्‍यांनी सांगितले. डेंग्यूचा प्रसार हा दूषित डास चावल्याने होतो. याचे विषाणू साठलेल्या स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला टायर, भांड्यांमध्ये पावसाचे पाणी साठू देऊ नका असे आवाहन सरपंच खान यांनी केले आहे. लोकांनी ताप, सर्दी ही लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य येऊन उपचार करावेत अशा सूचना वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी दिल्या.

 

Back to top button