करूळ, भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या | पुढारी

करूळ, भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी तालुक्यात शनिवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळी  करूळ घाटमार्गात मोठ्या दगडासह दरड कोसळली. तर दुपारी भुईबावडा घाटमार्गात दरड कोसळली. यामुळे दोन्ही घाटमार्गांतील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून दोन्ही घाटमार्गांतील वाहतूक पूर्ववत  करण्यात आली. 

दरवर्षी करूळ व भुईबावडा घाटमार्गावर पावसाळ्यात अधूनमधून दरडी कोसळत असतात. गेले दोन दिवस तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे करूळ घाटमार्गात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळून आला. या घटनेची माहिती वाहनचालकांनी करुळ चेकनाक्यावर कार्यरत पोलिसांना दिली. वैभवावाडी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिस निरीक्षक अतुल जाधव व सहकारी घटनास्थळी पोहोचले. वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनीच जेसीबी मालकाला मोबाईलवरून संपर्क साधून  पाचारण केले. काही मिनिटातच जेसीबीच्या साहाय्याने मोठा दगड व कोसळलेली दरड बाजूला करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सिंधुदुर्ग व कोल्हापूरकडे ये-जा करणारी वाहतूक  झाली. वाहतूक पोलिस विलास राठोड, पोलिस कॉन्स्टेबल संदीप राठोड  उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी रविवारी सुट्टी असल्याने घरीच होते. पावसाळ्यात तरी घाटमार्गाची देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे

 
‘एनडीआरएफ’कडून भुईबावडा घाट मोकळा 

संततधार पावसामुळे घाटमार्गात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात दाखल एनडीआरएफच्या टीमने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी भुईबावडा घाटातील दरड बाजूला केली. त्यामुळे वाहतूक तत्काळ पूर्ववत झाली आहे. वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी कांबळे, दुडये आदी उपस्थित होते. दरम्यान, या टीमने करूळ घाट व भुईबावडा घाटमार्गाची पाहणी केली. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास करूळ व भुईबावडा घाटमार्गात दरडी कोसळण्याची भीती आहे. 

Back to top button