कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून सर्वच तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 96.4 मिमी इतका पडला. राजाराम बंधार्‍यावरून 5 हजार 914 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून सुरू असलेल्या विसर्ग आणि पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील साळगाव, शेळप, निळपण, वाघापूर व राजाराम हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच लहान -मोठ्या धरणांत अतिरिक्त पाणी असल्याने धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस नसतानाही मागील दोन दिवसांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार कायम आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधार्‍यावर पाणी पातळी 14 फूट 7 इंच इतकी होती. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चंदगड तालुक्यात 68 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. हातकणंगले- 21 मिमी, शिरोळ 25 मिमी, पन्हाळा 24 मिमी, शाहूवाडी 16 मिमी, राधानगरी 42 मिमी, गगनबावडा 96 मिमी, करवीर 29 मिमी, कागल 48 मिमी, गडहिंग्लज 60 मिमी, भुदरगड 45 मिमी, आजरा 73 मिमी पावसाची नोंद झाली.

राजाराम बंधारा पाण्याखाली; मार्गावरील वाहतूक झाली बंद

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा 

गेले काही दिवस पडत असलेल्या पावसाबरोबरच मंगळवारी रात्री आणि बुधवारी झालेल्या दमदार पावसाने रात्री नऊच्या सुमारास पंचगंगेचे पाणी  राजाराम बंधार्‍यावरून वाहू लागले. रात्री उशिरा बंधार्‍यावरून वाहतूक बंद  झाली. जवळच सुरू असलेले समांतर पुलाचे कामही बंद झाले.

बुधवारी सकाळी 7 वा. राजाराम बंधार्‍या जवळ पाणी पातळी 13.6 फुटांपर्यंत होती. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली. रात्री नऊच्या सुमारास बंधार्‍यावरून पाणी वाहू लागले. चौदा तासांत सुमारे तीन फूट उभी पाणी पातळीत वाढ झाली. गतवर्षीच्या पावसाळ्यात 16 जून रोजीच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला होता. 

घटप्रभा धरण ओव्हरफ्लो

चंदगड : पुढारी वृत्तसेवा 

चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस कोसळतो.  बुधवारी या धरणात 100 टक्के पाणी भरले आहे.

धरणाच्या  पूर्वेकडील सांडव्यावरून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर पॉवर हाऊस  येथून 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.  या धरणावर केली जाणारी वीजनिर्मिती सध्या बंद असून लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे  समजते. जिल्ह्यातील हे भरलेले हे पहिलेच धरण आहे. आंबोलीनजीक सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर तसेच तालुक्याच्या पश्चिम भागात  असलेल्या या धरणाच्या खालील भागांत हरितक्रांती झाली आहे. पूर्वी माळरानावर ओसाड पडलेल्या जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. फाटकवाडी ते दड्डी आणि  कर्नाटकातील काही गावांतील शेतकर्‍यांना या धरणाचा लाभ झाला आहे. सर्वात आधी धरण भरल्याने फाटकवाडी परिसरातील नागरिकांनी नवीन पाण्याचे पूजन केले.  आजअखेर या क्षेत्रात 445 मि.मी. पाऊस झाला आहे. तर, आज 113 मि.मी. पावसाची नोंद  झाली आहे.  

Back to top button