बोगस लोक आले अन् बोगस लस टोचून गेले! | पुढारी

बोगस लोक आले अन् बोगस लस टोचून गेले!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत निर्माण झालेल्या कोरोना लसटंचाईचा फायदा उठवणारे भामटे निर्माण झाले असून, अशाच भामट्यांनी कांदिवली परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीला चक्‍क पाच लाखांना गंडवले. मोठ्या-मोठ्या दवाखान्यांचे नाव सांगत हे भामटे आले आणि सोसायटीतील लोकांना चक्‍क बोगस लस टोचून गेले. 

लस तर घेतली. पण सोसायटीतल्या कुणालाही साधी अंगदुखी नाही किंवा डोकेदुखी नाही. जणू काही लस घेतलीच नाही. एखाद्याला तरी त्रास व्हायला हवा होता. जो तो एकमेकांना विचारे आणि कुठलेही लक्षण नाही हेच उत्तर मिळे. यातून संशय बळावला आणि आपण  एका लसीकरण घोटाळ्यात फसलो हे सोसायटीच्या लक्षात आले. 

नामांकित रुग्णालयाचे कर्मचारी म्हणून हे लोक कांदिवलीतील हिरानंदानी हाऊसिंग सोसायटीमध्ये आले. सोसायटीचाही विश्‍वास बसला. एक रहिवाशी हितेश पटेल यांनी सांगितले की, राजेश पांडे नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे प्रतिनिधी असल्याचे सांगत सोसायटी कमिटीच्या सदस्यांसोबत संपर्क साधला होता. या अभियानाचे संचालन संजय गुप्तांनी केले, तर महेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने सोसायटीच्या सदस्यांकडून पैसे घेतले. सोसायटीच्या आवारात 30 मे रोजी 390 लोकांना कोविशील्ड लस देण्यात आली. प्रत्येक डोससाठी 1,260 रुपये आकारले गेले. सोसायटीने एकूण 4 लाख 91 हजार 400 रुपये भरले. लस घेतल्यानंतर सोसायटीतील सदस्यांना मोबाइलवर कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नाही. आम्हाला लस घेताना सेल्फी किंवा फोटो घेण्यास परवानगी नव्हती. 

सोसायटीचे आणखी एक सदस्य ऋषभ कामदार म्हणाले की, लस घेतल्यानंतर कोणालाही प्रमाणपत्रही देण्यात आले नाही. 10-15 दिवसांनंतर प्रमाणपत्रे आली. मात्र, ती वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. नानावटी, लाइफ लाइन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्राकडून ती जारी करण्यात आली. या प्रमाणपत्र प्रकरणी संबंधित रुग्णालयांशी संपर्क केला तर सर्वच रुग्णालयांनी या सोसायटीत लसीकरण केले नसल्याचे सांगितले. 

पालिका उपायुक्त करणार चौकशी  

कांदिवलीच्या बनावट लसीकरण प्रकरणाबाबत मुंबई महापालिकेने दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पालिका उपायुक्त विश्‍वास शंकरवार चौकशी करणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाची 48 तासांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिले आहेत. महापालिकेनेही मुंबई पोलिसांना चौकशीकरता पत्र दिले आहे.

 

Back to top button