गोव्यात सलग मुसळ‘धार’  | पुढारी | पुढारी

गोव्यात सलग मुसळ‘धार’  | पुढारी

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गेले दोन दिवस सलग पावसाने जोरदार हजेरी लावली.  मंगळवारी काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेडणे, मडगाव, साखळी, एला (जुने गोवे) भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होता. गतवर्षीप्रमाणेच यंदाही पेडण्यात आतापर्यंत (1 ते 15 जून या कालावधीत) सर्वाधिक 589.6 मिमी (23 इंच) पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आज, बुधवारीदेखील मुसळधार शक्य असून वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यात शनिवारपासून पावसाने जोर धरला आहे. राज्यात सोमवारी रात्री व मंगळवारी 120.8 मिमी (4 इंच) इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम असेल. समुद्रात 60 ते 65 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वहात आहे.  

वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी तापमानात अधिक घट नोंद झाली आहे. पणजीत कमाल तापमान 27.3 अंश तर किमान तापमान 24.1 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले. तर मुरगावात कमाल 28.6 तर किमान 23.4 अंश सेल्सिअस नोंद झाले. वातावरणात 93 टक्के आर्द्रता होती. राज्यातील कमाल तापमान 28 अंशांपर्यंत कायम असेल.   

सरासरीपेक्षा पाऊस 22 टक्के अधिक 

राज्यात 1 ते 15 जून या कालावधीत 430.1 मिमी इतक्या पावसाने हजेरी लावली आहे. सामान्यत: या कालावधीत राज्यात 353.6 मिमी इतका पाऊस पडतो. पावसाचा जोर सध्या वाढला असल्याने आतापर्यंत पाऊस 22 टक्के अधिक आहे. सोमवारपर्यंत पावसाची 2 टक्के तूट बाकी होती. ती भरून निघाली असून, वरून सामान्य टक्केवारीपेक्षा पाऊस 22 टक्के अधिक नोंद झाला आहे, अशी माहिती वेधशाळेच्या आकडेवारीतून मिळाली.

Back to top button