मनोरंजनसृष्टीला उद्योगाचा दर्जा द्या; रंगकर्मींचा सूर | पुढारी

मनोरंजनसृष्टीला उद्योगाचा दर्जा द्या; रंगकर्मींचा सूर

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मनोरंजनसृष्टी हा भारताचा चेहरा आहे, तसेच अर्थव्यवस्थेला गती देणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र  गोरेगावची चित्रनगरी उभारल्यानंतर सरकारने मनोरंजनसृष्टीसाठी काहीही केलेले नाही. या विश्वाकडून सरकारला मोठ्या प्रमाणावर आयकर तसेच वस्तू व सेवा कर मिळतो, पण या सृष्टीकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष आहे. त्यामुळे  सरकारने मनोरंजनसृष्टीला उद्योगाचा दर्जा द्यावा, असे मत निर्माते नितीन वैद्य यांनी व्यक्त केले आणि अन्य रंगकर्मींनीही त्यांच्या सुरात सूर मिळवला. 

दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक   विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त, विनय आपटे प्रतिष्ठान आयोजित  ‘मनोरंजन सृष्टी सद्यस्थिती-परिवर्तन एक कसोटी’ या विषयावरील ऑनलाईन परिसंवादात गुरुवारी वैद्य यांच्याशिवाय नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे, चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव, सतीश राजवाडे, अभिनेत्री सुलेखा तळवलकर, नितीन वैद्य आणि जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर सहभागी झाले होते. सूत्रसंचालन निर्माते, दिग्दर्शक, लेखक  अजित भुरे यांनी केले. प्रतिष्ठानच्या वैजयंती आपटे यांनी प्रास्तविक केले. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर रसिक प्रेक्षक अट्टाहासाने चित्रपट-नाटके पाहण्यासाठी बाहेर पडतील, असा विश्वास जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर यांनी व्यक्त केला.

मराठी नाटकांविषयी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले, कोरोनानंतरच्या काळात नाटकांचे अस्तित्व कसे टिकवायचे तसेच यापुढे नाटकाकडे प्रेक्षक पुन्हा कसे वळतील, याचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी संपूर्ण नाट्य व्यवसायाची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे, या माध्यमाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत, त्यामुळे या स्थित्यंतरातूनही नाटक बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्या पिढीला नाटकाकडे वळविण्यासाठी प्रसिध्द कलाकारांना घेऊन नाटक करणे, जुनी नाटके नव्या संचात, कमी प्रयोगात रंगमंचावर आणणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नव्या पिढीला नाट्य व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अशा सूचना केंकरे यांनी केल्या. 

दिग्दर्शक, लेखक व अभिनेते सतीश राजवाडे म्हणाले, कोरोना काळात चित्रीकरण करताना अडचणींवर मात करत कसे काम करायचे हे अधिक चांगल्या प्रकारे शिकता आले. दिग्दर्शक संजय जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टीची व्यथा मांडली. ते म्हणाले, टाळेबंदीआधीच प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे फारसे वळत नव्हते. साहित्यकृतीवर आधारे किंवा तद्दन  व्यावसायिक चित्रपट केला तरी प्रेक्षक चित्रपटगृहात मराठी चित्रपट पाहायला येतील की नाही, याची खात्री नाही, मराठी चित्रपटांना थिएटर मिळेल की नाही, तसेच चित्रपट करमणूक प्रधान करायचा की साहित्यकृतींवर करायचा, की प्रेक्षकांना आवडेल, असा करायचा, या गोंधळात मराठी चित्रपटसृष्टी आहे, पुढच्या काळात चित्रपटाची भाषा , अर्थकारण, सगळेच बदलेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 

ओटीटीसारखे तंत्रज्ञान हे टीव्ही पुढचे आव्हान असले तरी ते महागातले आणि बाहेरचे माध्यम आहे. तसेच मध्यमवर्गीयांना अजूनही हे माध्यम आर्थिकदृष्ट्या तसेच सांस्कृतिक मूल्यांच्या दृष्टीने परवडणारे नाही. त्यामुळे या माध्यमाने टीव्हीला अजून तरी धक्का दिलेला नाही, असे मत नितीन वैद्य यांनी व्यक्त केले. तसेच राज्यांचे  सांस्कृतिक मंत्र्यांचे योगदान हे फोटोपुरतेच आहे, अशी परखड टीका त्यांनी केली. 

कोरोनाच्या काळात आणि आधीही बॉलीवूड चित्रीकरणासाठी बाहेर जात आहे. आता मालिकाही गेल्या. यापुढे जर शासनाने सुविधा दिल्या नाही तर मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अन्य राज्यांनी सोयी, सवलती दिल्या तर तिकडे चित्रीकरणासाठी जातील.

 

Back to top button