आता दाखल्याशिवाय मिळणार नववी, दहावीच्या वर्गात प्रवेश! | पुढारी

आता दाखल्याशिवाय मिळणार नववी, दहावीच्या वर्गात प्रवेश!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शाळेतील विद्यार्थ्यांना आता दुसर्‍या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट नसेल तरीही आता त्या विद्यार्थ्याला कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याचा जन्मदाखला हा आता त्याचा पुरावा असणार आहे. यापूर्वी शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. आता हा नियम नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे.

आर्थिक अडचणीमुळे किंवा फी न भरल्यामुळे इयत्ता नववी किंवा दहावीच्या एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खासगी शाळेतून टी.सी. म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच (एलसी) देण्यात आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानित माध्यमिक शाळेत सदर दाखल्या अभावी प्रवेश देण्यात येत     नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या कागदपत्रांच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. 

आरटीई अधिनियमातील कलम 5 मधील (2) व (3) नुसार विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्‍या शाळेत प्रवेश घ्यावयाचा हक्क असेल. साधारण परिस्थितीमध्ये दुसर्‍या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेतील शाळाप्रमुख तत्काळ ट्रान्सफर सर्टिफिकेट देतात. काही कारणांमुळे असे प्रमाणपत्र मिळवण्यास उशीर होत असेल किंवा सदर दाखला नाकारला जात असेल तर दुसर्‍या शाळेत (शासकीय किंवा अनुदानित) प्रवेश देण्यात उशीर करणे अथवा प्रवेश नाकारणे अन्यायकारक ठरेल. 

माध्यमिक शाळा संहितेतील कलम 18 नुसार एका शाळेतून दुसर्‍या शाळेत प्रवेश घेण्याच्या बाबतीत ही तरतूद स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यानुसार आता प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित होणार्‍या शाळेत विद्यार्थ्याला वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन इयत्ता दहावीपर्यंत वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यात यावा. प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही तसेच शिक्षण खंडित होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळाप्रमुखांनी किंवा मुख्याध्यापकांनी घ्यावी, असेही निर्णयात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

का दिला जाणार प्रवेश

1 शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय आणि अनुदानित शाळेत प्रवेश नाकारला जात आहे. 

2 पूर्वी शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी लागू राहील.

3 आधीच्या  शैक्षणिक संस्थेने शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही तर विद्यार्थ्याला त्याच्या वयानुसार प्रवेश घेता येईल.

4 एल.सी./टी.सी. उशिरा मिळाल्यास किंवा नाकारण्यात आल्यास अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश. 

 

Back to top button